दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले भारतीय तिरंदाजीतील पहिले विश्वविक्रमी नाव म्हणून ज्या लिंबा राम यांचे नाव घेतले जाते, त्यांना आजारपणात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लिंबा राम यांच्यावरील उपचारांसाठी पाच लाख रुपयांच्या अतिरिक्त आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
1992च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक हुकलेल्या लिंबा राम यांना मेंदूशी संबंधित आजाराने ग्रासले आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु दिवसागणिक आजारात वाढ होत असून हा आजार पार्किन्सनकडे सरकरण्याची भीती त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांना वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागू शकते. ‘हा आजार पूर्णपणे बरा होणारा नसला, तरी किमान नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे त्यांना अधिकाधिक चांगल्या उपचारांची गरज आहे. त्यामुळेच आम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे,’ अशा शब्दात लिंबा राम यांच्या पत्नी मेरिअन जेन्नी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तिरंदाजी संघटना आणि माजी अध्यक्ष बीव्हीपी राव, तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांनी लिंबा राम यांना मदतीसाठी प्रयत्न केले. ‘साइ’च्या संचालक नीलम कपूर यांनी संस्थेच्या अधिकार्यांना तत्काळ आदेश देत लिंबा राम यांना एम्स रुग्णालयात दाखल करून घेतले, तर क्रीडामंत्री राठोड यांनी त्वरित पाच लाख रुपयांचा अतिरिक्त आरोग्य विमा त्यांना देत असल्याचे जाहीर केले, तसेच पत्नी जेन्नी यांची एम्स रुग्णालयानजीकच राहण्याची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय ‘साइ’चे सचिव एस. एस. छाबरा यांनी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून लिंबा रामच्या प्रकरणाला विशेष दर्जा देत त्याला काही अनुदानरूपी मदत देण्याची विनंती केली आहे.