30 वर्षांपूर्वीच्या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळलेले
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाच्या वेशीवर आणि चिरनेर जंगलसत्याग्रहातील शूरवीर रामा बामा कोळी यांच्या हुतात्मा स्मारकाजवळील खाडी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळले आहे. त्याचप्रमाणे या पुलाला वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्यासुद्धा गंजून निकामी झाल्याने खाली पडू लागल्या आहेत. त्यामुळे त्यावरून जाणार्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा पूल कोसळून दुर्घटना होऊ शकते, तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उरण कार्यालयाचे उपअभियंता ए. जी. करपे यांनी या पुलाची तत्काळ पाहणी करून पुलाचे नव्याने बांधकाम करण्याच्या हालचाली कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असून, 3,500 लोकसंख्या असलेल्या या मोठीजुई गावात जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे दळणवळण आणि गावात येणारी प्रवासी वाहतुकीची एसटी बस, रिक्षा, मालवाहतूक वाहने व दुचाकी आणि पादचार्यांचा दैनंदिन मार्ग बंद झाल्यास त्याचा फटका येथील अनेक रहिवाशांना होणार आहे, तसेच या गावातील सामान्य रुग्ण, गरोदर महिला, वयोवृद्ध महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय यामुळे होऊ शकते. मोठीजुई ग्रुपग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच महेश पाटील यांनी पुलाच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे हा पूल तत्काळ नव्याने बांधण्यात येऊन हा गावात जाण्याचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता ए. जी. करपे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.