Breaking News

हक्काच्या रजेसाठीही द्यावी लागतेय चिरीमिरी

एनएमएमटी प्रशासनातील धक्कादायक प्रकार

नवी मुंबई : प्रतिनिधी

आपल्या हक्काची रजा शिल्लक असताना व ती मंजूर करून घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय वरिष्ठ रजा मंजूर करत नसल्याने मनपाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जवळचा अधिकारी व कर्मचारी असेल, तर त्याला तत्काळ रजा मिळते, पण निकटचा नसेल, तर त्याला रजा मिळत नाही. याकडे आता आयुक्तांनीच लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचारी व अधिकारी करत आहेत.

सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध प्रकारे रजा घेण्याच्या मुभा आहेत. त्यामध्ये किरकोळ, अर्जित, आजारपण, पर्यायी अशा अनके प्रकारच्या रजा घेता येतात, परंतु मनपाच्या परिवहन विभागात रजेसाठी अर्ज केल्यानंतर काहींची रजा मंजूर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

सध्या एनएमएमटीच्या प्रभारी मुख्य व्यवस्थापाकपदी शिरीष आरदवाड हे आहेत. यांनी आपल्या कार्यक्षत्रातील असूडगाव, घणसोली व तुर्भे या ठिकाणी व्यवस्थापकपदी आपल्या जवळच्या अधिकार्‍यांना बसविले आहे. त्यामुळे या तीनही आगारात कुणीही रजेसाठी अर्ज केला, तर त्याची माहिती प्रभारी मुख्य व्यवस्थापकांना देण्यात येते. त्यानंतर त्या रजेच्या अर्जावर निर्णय होऊन रजा मंजूर किंवा नामंजूर करण्यात येते, परंतु आपल्या जवळचा संबंधित कर्मचारी नसेल, तर त्याला रजा मंजूर करण्यात येत नाही. मग त्या वेळी चिरीमिरी दिली, तर लगेच रजा मंजूर होत असल्याने कर्मचारी व अधिकार्‍यांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

मुलांचे शाळा प्रवेश, आई, वडील, मुलं, नातेवाईक आजारी असताना रजा मागण्यात येते, तसेच नातेवाईकांच्या लग्नात रजा मागण्यात येते.त्याचबरोबर इतर कारणासाठी रजेची मागणी होत असते, परंतु हक्काची रजा मंजूर होत नसल्याने साहजिकच कर्मचारी गैरहजर राहतो. त्यामुळे त्याच्या पगारातून गैरहजर दिवसाचा पगार कापला जातो. यामुळेही त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. आधीच तीन कोटी रुपये दर महिना तुटीत चाललेली एनएमएमटी परिवहन सेवा कर्मचारी व अधिकार्‍यांचे मनोबल कमी करून प्रगती करेल का, असा सवाल विचारला जात आहे.जर परिवहन सेवा वाचवायची असेल, तर आयुक्त एन. रामस्वामी यांनी लक्ष घालणे गरजेचे असल्याचे अनेक कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply