Breaking News

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त
राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने नुकतेच शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेचे आयोजन खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले.
स्पर्धा 17 व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या वयोगटात आणि विविध वजनी गटात घेण्यात आली. 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात मयुरेश चौधरी याने 52 किलो वजन गटात सुवर्ण, पार्थ घरतने 56 किलो गटात सुवर्ण, राहुल सिंग याने 60 किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. शाहिद खानने 45 किलो गटात रौप्य, समीर चव्हाणने 75 किलो गटात रौप्य, अजित झिने याने 80 किलो गटात रौप्य, सुमित शिवगाडगे याने 85 गटात रौप्यपदक प्राप्त केले. आदित्य कोंडाळकरने 52 किलोगटात कांस्य, हर्षित नाईकने 70 वजन गटात कांस्य, आर्यन भातोसे याने 75 वजन गटात कांस्यपदक मिळविले. मुलींच्या वयोगटात प्रगती चव्हाण हिने 40 किलो वजन गटात सुवर्ण, प्रिती गुप्ताने 60 किलो गटात सुवर्ण, सुहानी पांडेने 56 किलो गटात कांस्य, जिया वासकरने 52 किलो गटात कांस्य, भूमी वास्करने 48 गटात कांस्यपदक नावे केले.
19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात आनंद पराते याने 75 किलो वजन गटात सुवर्ण, अबुसुफियान शेखने 80 किलो गटात सुवर्ण, शिवसुंदर साहूने 65 किलो वजन गटात रौप्य, अहमद पारकरने 52 किलो गटात रौप्य, रवी विश्वकर्माने 48 किलो गटात कांस्य व गुरु महेक रंधवा याने 56 किलो गटात कांस्यपदक पटकाविले. मुलींच्या गटात भावना सिंग, सानिया शेख, मिसबा बेबल, खुशबू सहानी यांनी सुवर्ण, रजमिन शेख, नंदिनी शर्मा, फातिमा शेख, कस्तुरी शिंदे, दिशा श्रीवास्तव, पायल ठाकूर यांनी रौप्य, तर आरती दिवाकर हिने कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेत रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 11 सुवर्ण, रौप्य 12 व कांस्य नऊ अशी एकूण 32 बक्षिसे जिंकली. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संभाजी जाधव, प्रवीण पाटील, अजिंक्य भगत, सहाय्यक शिक्षक अभिजित जोगदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक पटकाविणार्‍या विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,  संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, सचिव डॉ.एस. टी.गडदे, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य निशा नायर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर जोशी, माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष खांदेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा

आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या …

Leave a Reply