मुरूडच्या विहूर पुलावरील खड्डे बुजविले
मुरूड : प्रतिनिधी
संततधार पावसामुळे तालुक्यातील विहूर येथील छोट्या पुलावर आणि जोड रस्त्यांवर खड्डे पडले होते. या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्या बाबतचे वृत्त प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम खात्यास खडबडून जाग आली. खडी व रेंजगा टाकून येथील मोठमोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. निधी मंजूर होऊनही विहूर पुलाला संरक्षक भिंत न बांधल्यामुळे पुलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. मात्र त्या रस्त्यार व दोन्ही बाजूच्या जोड रस्त्यांवर पावसामुळे मोठं मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे फार जिकरीचे झाले होते. विशेषत: दुचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम खात्याने विहूर पुल परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेतल. पुलाच्या उजव्याबाजूकडील खड्डे खडी व रेंजगा टाकून बुजवून सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रवासी व वाहनचालकांना तात्पुरता दिलासा दिला आहे.