कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या एक्झर्बिया कंपनीच्या दोन मोठ्या गृह प्रकल्पांसाठी वीज वाहून नेणार्या केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पोहीपासून वारेपर्यंत जाणार्या रस्त्याच्या कडेने ही केबल टाकली जाणार होती, मात्र कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याच्या अभियंत्यांनी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून केबल टाकण्यास रस्ते विकास महामंडळाकडून विरोध करण्यात आला आहे.
एक्झर्बिया कंपनी तालुक्यातील वरई आणि अवसरे या ठिकाणी मोठे गृहप्रकल्प साकारत आहे. तेथे हजारोंच्या संख्येत सदनिका असणार आहेत. त्या घरांना वीज मिळावी यासाठी वारे येथे असलेल्या वीज उपकेंद्र येथून वीजवाहिनी नेण्यासाठी महावितरण कंपनीला ठरावीक रक्कम भरली. त्यानंतर वारे येथून पोहीपर्यंत कर्जत-मुरबाड रस्त्याने व नंतर पोहीपासून अवसरेपर्यंत वीज नेण्याचे काम महावितरण कंपनीने मंजूर केले होते. 2019मध्ये वारे येथून विजेचे खांब उभे करून वीज एक्झर्बिया कंपनीच्या गृहप्रकल्पापर्यंत नेली जात होती, मात्र पोशिर गावातील ग्रामस्थांनी विजेचे खांब टाकण्यास विरोध करून रस्त्याच्या कडेला उभे केलेले विजेचे खांब काढून टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर संबंधित कंपनीने तेथे रस्त्याच्या कडेने जमीन खोदून केबल टाकून
वीजवाहिनी नेण्याचे काम सुरू केले. अजूनही पोशिर ग्रामस्थ आपल्या जागेतून केबल टाकू देत नाहीत. त्यामुळे केबल टाकण्याचे काम घेणार्या ठेकेदाराने पोहीपासून वारे येथील वीज उपकेंद्रापर्यंत केबल टाकण्याचे काम 7 फेब्रुवारीपासून सुरू केले होते.
दरम्यान, राज्यमार्गाच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे खोदकाम करून वीज वाहून नेणारी केबल टाकता येत नाही, परंतु नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला केबल टाकली गेली. तसाच प्रकार आपण कर्जत-मुरबाड रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून केबल टाकून नेऊ शकतो असा विश्वास ठेकेदाराला असल्याने केबल टाकण्यास सुरुवात केली होती, मात्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमआरडीसीच्या अभियंत्यांनी रस्त्याला बाजूला केबल टाकण्यास विरोध करून काम बंद पाडले.
रस्त्याच्या मध्यापासून 15 मिटर अंतरावर खोदकाम करून केबल टाकण्यात यावी, अशी सूचना राज्य रस्ते वाहतूक विकास महामंडळाचे साइट इंजिनिअर यांनी दिली आहे.पोही येथे आरसीसी रस्त्याच्या बाजूला काढण्यात आलेल्या गटारातून केबल टाकली जात आहे. ते गटार पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी बांधले आहे, मात्र त्या गटारात केबल टाकून पाण्याचा मार्ग बंद करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे. दरम्यान, याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ उपअभियंता सीमा पाटील यांनीही आपल्याकडे असलेल्या रस्त्याच्या मध्यापासून 15 मिटरपर्यंत कोणतेही बांधकाम अथवा खोदकाम करू नये, असे आदेश दिले आहेत, तर आजूबाजूचे शेतकरीही केबल टाकण्यास विरोध करीत असल्याने एक्झर्बिया कंपनीच्या प्रकल्पात वीज कशी येणार हा प्रश्नच आहे.
आम्ही आमच्या मालकीच्या रस्त्याच्या आजूबाजूला कोणतेही नवीन अतिक्रमण अथवा खोदकाम होणार नाही याची काळजी घेत आहोत. जे नियम आहेत त्या नियमांचा आधार घेऊन रस्त्याच्या मध्यापासून 15 मिटर अंतरावर खोदकाम करून केबल टाकण्यास सुचविले आहे.
-सीमा पाटील, उपअभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ