Breaking News

महाराष्ट्राच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी

भाजप-शिवसेना युतीचे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा होती. या ठिकाणी ईश्वर म्हणजेच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची अशी इच्छा होती. हिंदुत्ववादी विचारांच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपबरोबर आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 23) येथे व्यक्त केला. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी बोलत होते. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या, ओमप्रकाश धुर्वे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे राज्य आल्यावर पहिली कार्यकारिणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज गड जिंकल्यावर तेवढ्यावरच थांबायचे नाहीत, तर गडाची डागडुजी करायचे आणि चिरेबंदी, शिबंदी लावून पुढे जायचे. आपल्यालाही हेच करायचे आहे. महाराष्ट्रातील सत्तेचा गड जिंकला असला तरी आपण हे मानणारे आहोत की सत्ता आपले साध्य नसून साधन आहे. सामाजिक, आर्थिक परिक्रमाचा उपक्रम म्हणून त्याकडे पाहतो. म्हणूनच आपण हा गड जिंकलो असलो तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी विकासाची यात्रा सुरू केली आहे त्या यात्रेत वेगाने पुढे जात विकासाच्या पहिल्या क्रमांकावर आणण्याचा गड जिंकल्याशिवाय थांबायचे नाही. महाविकास आघाडी सरकारने विकासाला प्राधान्य देण्याऐवजी सूडबुद्धीचा कारभार सुरू केला होता. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक केली गेली. या परिस्थितीतही कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले. महाविकास आघाडी सरकारने वारंवार हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा आणि दाऊदच्या विचारांचा बचाव करायचा असे प्रकार सहन न झाल्याने एकनाथ शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने जनतेने आता मोकळा श्वास घेतला आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे. आम्ही कोणाचेही लांगुलचालन करणार नाही, सर्वांना समान न्याय देऊ, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भाजप नेतृत्वाने कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता. केवळ सत्तेसाठी त्यांनी जनादेशाचा अपमान केला, कारण काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जायचे त्यांनी आधीच ठरवले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी चालवत आहेत. हीच खरी शिवसेना आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून मी सरकारबाहेर राहून पक्षाचे कार्य करण्याचे ठरवले होते, परंतु पक्षाने मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला, मी तो पाळला. पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. हा माझ्या दृष्टीने कृतकृत्यतेचा क्षण होता, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. आम्ही तातडीने आवश्यक कार्यवाही करून हे आरक्षण परत मिळवले. मराठा आरक्षण विषयही आम्ही मार्गी लावू. विकासाचा कार्यक्रम धडाक्याने राबवू. नव्या सरकारने सत्तेत आल्या आल्या अनेक निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेल स्वस्त केले. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानसाठी 12 हजार कोटींची तरतूद केली. गणेशोत्सव, दहीहंडीवरील निर्बंध उठवले. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी निविदा काढली गेली. आरे कारशेडवरील बंदी उठवली. वारकर्‍यांना टोलमाफी दिली, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, पनवेलमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

उत्कृष्ट नियोजनाबद्दल मान्यवरांकडून कौतुक

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात झाली. उत्कृष्ट आयोजन व यशस्वी नियोजन या बैठकीचे वैशिष्ट्य ठरले. यानिमित्ताने पनवेल परिसरात संपूर्ण वातावरण भाजपमय पहायला मिळाले. बैठकीसाठी आलेल्या सर्व मान्यवर तसेच प्रतिनिधींचे स्वागत ते समारोप, निवास, पार्किंग, भोजन अशी सर्व व्यवस्था उत्तम होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांनी नियोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सहकार्‍यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन;  भाजप प्रदेश कार्यसमितीमध्ये विविध प्रस्ताव आणि ठराव

पनवेल ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सोबत उपस्थित होते. प्रदेश कार्यसमिती बैठक पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. याबाबत माहिती देताना आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, या बैठकीत तीन प्रस्ताव संमत झाले. राजकीय, कृषिविषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राजकीय प्रस्ताव मांडताना गेल्या अडीच वर्षांत मविआ सरकारने राज्यात केलेल्या अधोगतीवर चर्चा करण्यात आली. भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव मांडला तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातील शिवसेनेने केलेला उठाव व स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन करण्यात आले. या सरकारने 30 दिवस पूर्ण होण्याआधीच इंधन दरकपात, ओबीसी आरक्षण, शेतकर्‍यांना प्रोत्साहन असे वेगवेगळे निर्णय घेतले, तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लोकनेते दि. बा. पाटील विमानतळाचे नामकरण असो वा गणेशोत्सव, दहीहंडी व मोहरमसारख्या सणांचा निर्णय घेतले. ज्या गतीने सरकार काम करीत आहे. पहिल्या तीन कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र हिताच्या निर्णयांची मालिका शिंदे-फडणवीस सरकारने घेतली, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन या ठरावात करण्यात आले. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने घर घर तिरंगा या अभियानासह सशक्त बूथ यंत्रणा, आगामी निवडणुकांसाठी भाजपची व्यूहरचना, ज्या बूथवर कमी मतदान झाले त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी काम, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत हा विचार घेऊन संघटनात्मक रचना याबाबतही सविस्तर चर्चा या वेळी करण्यात आल्याची माहिती आमदार अ‍ॅड. शेलार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याचे लोकार्पण

पनवेल ः  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव असलेल्या पनवेल तालुक्यातील शिरढोण येेथील त्यांच्या नूतनीकृत वाड्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड उपमुख्यमंत्र्यांसमवेत होते. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असंतोष तयार केला. सशक्त क्रांतीचे बिजारोपण केलेे. त्यांच्या वाड्याच्या नूतनीकरणासाठी आपले सरकार असताना निधी मिळाला होता आणि त्याचे आज लोकार्पण होतेय हे मी भाग्य समजतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. येथील ग्रामपंचायतींकरिता ज्या काही योजना आपल्या मनात आहेत त्याकरिता एमएमआरडीएचा निधी देण्यासाठी मी प्रयत्न करेन. गावे चांगली व्हावीत तसेच ग्रामस्थांच्या आशा-आकांशा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या वेळी त्यांनी फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून वनवासी बांधवांसाठी फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला असून या दवाखान्याचे उद्घाटन या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास तहसीलदार विजय तळेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, भाजप नेते विनोद साबळे, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना कातकरी, उपसरपंच रेश्मा वाजेकर, माजी सरपंच गजानन घरत, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, विजय भोपी, ग्रामपंचायत सदस्य संगीता चौधरी, मोनाली घरत, निकिता चौधरी, सानिका कातकरी, सुदाबाई माळी, माजी सदस्य प्रमोद कर्णेकर, सांगुर्ली ग्रामपंचायतीच्या सदस्य सुवर्णा पाटील, माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, साधना वाजेकर, पळस्पे ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गवंडी, विजय गवंडी, प्रतीक भोईर, शरद वांगिलकर, मंदार जोग, भाजप गाव अध्यक्ष नितेश मुकादम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply