Breaking News

दोन मिनिटांत फायनलची तिकिटे संपली ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

हैदराबाद : वृत्तसंस्था

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणार्‍या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला आव्हान देणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली फायनल लढत याची देही… पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक होते, मात्र त्यांच्या या आनंदावर दोन मिनिटांतच विरजण पडले. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे आणि त्या सामन्याची तिकिटं अवघ्या दोन मिनिटांत विकली गेली. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि त्यांनी तिकीट विक्रीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अंतिम सामन्याच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केली. बीसीसीआयच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला, परंतु त्याहीपेक्षा ही तिकिटं दोन मिनिटांत संपल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. हैदराबाद क्रिकेट संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्याने विचारले की, ‘दोन मिनिटांत सर्व तिकिटं कशी विकली जाऊ शकतात? ही अचंबित करणारी गोष्ट आहे आणि बासीसीआयला याचे उत्तर द्यावे लागेल.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची क्षमता ही 39 हजार इतकी आहे. त्यापैकी 25 ते 30 हजार तिकीटं विक्रीसाठी ठेवली जातात, मात्र या वेळी किती तिकिटं विक्रीसाठी ठेवण्यात आली याची कल्पनाच कुणाला देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1000, 1500, 2000, 2500, 5000, 12500, 15000 आणि 22500  अशी तिकिटांची किंमत आहे, मात्र ऑनलाईनवर फक्त 1500, 2000, 2500 आणि 5000 रुपये किंमत असलेली तिकिटं होती आणि तीही विकली गेली. 1500 व 2000 रुपयांची तिकिटं आता खिडकीवर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑनलाईन तिकीट विक्री करणार्‍या कंपनीकडून सुधीर रेड्डी यांनी सांगितले की, ‘मी कोणतीच माहिती देऊ शकत नाही. आम्हाला जेवढी तिकिटं देण्यात आली ती आम्ही विकली. याव्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास ती बीसीसीआयकडे विचारावी.’

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply