Breaking News

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्राचा पाणीप्रश्न सुटणार

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून, पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत: त्यात लक्ष घातले आहे. त्यासंबंधी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याबरोबर चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवल्याने आता महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्राचा

पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. 

बुधवारी (दि. 8) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अनिल भगत, संतोष शेट्टी, संजय भोपी, तेजस कांडपिळे, डॉ. अरुणकुमार भगत, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका सीताताई पाटील, राजेश्री वावेकर, कीर्ती नवघरे, भीमराव पवार, अमर उपाध्याय आणि तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, अधीक्षक अभियंता काळे आणि इतर अधिकार्‍यांची भेट घेऊन पनवेल महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्रातील तुटपुंज्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा केली.

या वेळी पनवेल, खारघर, कामोठे, खांदा कॉलनी, कळंबोली येथील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी चर्चा करताना पाणी पुरवठ्याच्या प्रश्नासंबंधी आणि टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत सिडकोच्या अधिकार्‍यांकडून जबाबदारीने उत्तर मिळत नसल्याचे लक्षात आणून दिले. या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली.

सिडकोने हाती घेतलेल्या मास हाऊसिंग प्रोजेक्ट अंतर्गत 90 हजार घरे बांधण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेत पाणी तुडवडा आहे. जोपर्यंत महापालिकेला 90 एमएलडी पाण्याची उपलब्धता होत नाही, तोपर्यंत हा प्रोजेक्ट सिडकोने राबवू नये, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली. यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे लोकेश चंद्रा यांनी या वेळी सांगून अधिकार्‍यांना सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाण्याच्या तक्रारींची पाहणी करून त्या सोडवण्यास सांगितले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्‍यांत असलेला समन्वयाचा अभाव आणि ठोस कारवाई करण्यात त्यांना नसलेला रस याकडे लक्ष वेधले असता लोकेश चंद्रा यांनी तक्रार गांभीर्याने घेऊन अधिकार्‍यांना पाण्याच्या प्रश्नाबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

-पनवेल, नवीन पनवेल, कळंबोलीत 25 टक्के पाणीपुरवठा होतो. जूनच्या शेवटपर्यंत पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्याने त्याचे योग्य वितरण केले जावे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत योग्य कारवाई करण्यासाठी वेळ मागितला आहे. यासाठी कायमस्वरूपी योजना अमलात आणण्यासाठी हेटवणेचे पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.   

– डॉ. कविता चौतमोल, महापौर

-नवीन पनवेल येथील सेक्टर 15मधील पीएल-5 व पी-6मध्ये सिडकोने बांधलेल्या इमारतींमध्ये भूमिगत पाण्याच्या टाक्या नाहीत. त्यामुळे कमी दाबाने पाणी आल्यास या इमारतींतील रहिवाशांना पाणी मिळत नाही. टाटा, एमजीपी आणि सिडको आपल्या कामासाठी वेगवेगळ्या दिवशी शटडाऊन घेतात. त्यामुळे तीन दिवस पाण्याचा गोंधळ होतो. ते शटडाऊन एकाच दिवशी घ्यावे.

-तेजस कांडपिळे, नगरसेवक

नवीन पनवेलमध्ये सिडकोकडून कमी पाणीपुरवठा होत असल्याने टँकरची मागणी केली असता आम्ही टँकरने पाणी पुरवतो, असे अधिकार्‍यांनी सांगितले. तुमच्याकडे किती टँकर आहेत, असे विचारले असता आमच्याकडे दोन टँकर असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु दोन टँकरने पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यासाठी अधिक टँकरची व्यवस्था करण्याची मागणी केली.

– संतोष शेट्टी, नगरसेवक

– हेटवणे धरणाची क्षमता वाढवून अधिकाधिक पाणीपुरवठा होण्यासाठी वेगाने प्रयत्न  

– कोंडाळे धरणासाठी नेमलेल्या सल्लागारांकडून लवकर अहवाल घेऊन त्यानुसार शक्य तेवढ्या तातडीने काम पूर्ण करणार

– पाताळगंगा-पनवेल पाइपलाइन टाकण्याचे (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार

– याशिवाय टाटा पॉवर सोमवारी शटडाऊन घेते. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. यापुढे सोमवारीही पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असे टाटा पॉवरला सांगण्याचे ठरले.

या सर्व उपाययोजनांमुळे पाणी पुरवठ्यात पुरेशी वाढ होईल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply