पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 19 प्राथमिक शाळा शिक्षण विभागाकडून अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत शाळांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पनवेल तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. या शाळांना मान्यता नसल्याने येथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पालकांना केले आहे.
रायगड जिल्ह्यात शासनाच्या परवानगीशिवाय काही अनधिकृत शाळा सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील सात, उरण तालुक्यातील दोन, मुरुडमधील एक, महाडमधील दोन, म्हसळ्यातील पाच आणि कर्जतमधील दोन शाळांचा समावेश आहे. या बेकायदा शाळा शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय सुरु करु नयेत, असे शिक्षण विभागाने बजावले आहे. तसेच अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी आरटीई 2009 च्या कायद्याप्रमाणे व महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार उचित कार्यवाही करावी, अशा सूचनाही रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकार्यांना दिल्या आहेत.
पालकांनी आपल्या पाल्यास या अनधिकृत प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालक जबाबदार राहतील, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असेही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी स्पष्ट केले आहे.
तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादी
1) वेदांत पब्लिक स्कूल, कळंबोली, पनवेल
2) ए.डी. कोली शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई माध्यमिक विद्यालय धामणी, पनवेल
3) शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल
4) पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल, कोपर, पनवेल
5) कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल, तळोजे, पाचनंद, पनवेल
6) अकर्म इंग्लिश स्कूल, तळोजे, पनवेल
7) मार्शमेलो इंटरनॅशनल स्कूल, ओवे, पनवेल