Breaking News

पेनी स्टॉक्सचे आकर्षण ही घोडचूकच का आहे?

कमी भाव असणार्‍या कंपन्यांची नोंदणी रद्द तरी होऊ शकते किंवा त्यांचे भाव काही पैशातही येवू शकतात. कारण त्या कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाचे प्रश्न येतात. याउलट अगदी तळाशी घुटमळणार्‍या बाजारात एखाद्या चांगल्या म्हणजेच चांगले फंडामेंटल्स असणार्‍या कंपनीचे शेअर्स तुलनेने कमी भावात मिळत असतील तर ती संधी सोडता कामा नये, मग पदरात पडणार्‍या शेअर्सची संख्या ही भले कमी असो.

अनेक ओळखी पाळखीचे लोक मला स्वस्तातील शेअर्सबद्दल विचारणा करतात. त्यांचा रोख हा पेनी स्टॉक्सकडे असतो परंतु बाजार महाग असताना देखील कमी भाव असणार्‍या कंपन्या यास्वस्त म्हणजे कमी मूल्याच्याच म्हणजे निकृष्ट असू शकतात. अशा शेअर्समध्ये, गुंतवणूक करण्यासाठी असलेली रक्कम गुंतवणे, ही घोडचूक ठरू शकते. अशा लोकांना वाटते की भाव कमी आहे म्हणजे त्यात जास्त शेअर्स खरेदी करता येतील. परंतु अशा गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की अशा कंपन्यांच्या बाबतीत कधीही लाखाचे बारा हजार देखील होऊ शकतात, काय खात्री असते की, कमी भाव असणार्‍या कंपन्यांची नोंदणी रद्द होणार नाही किंवा त्यांचे भाव काही पैशात येणार नाहीत? याउलट अगदी तळाशी घुटमळणार्‍या बाजारात एखाद्या चांगल्या म्हणजेच चांगले फंडामेंटल्स असणार्‍या कंपनीचे शेअर्स तुलनेने कमी भावात मिळत असतील तर ती संधी सोडता कामा नये मग पदरात पडणार्‍या शेअर्सची संख्या ही भले कमी असो.

उदा. ऑक्टोबर 2018मध्ये जेव्हा बाजार पडला तेव्हा आरकॉमचा 1 शेअर दहा रुपयांना मिळत होता तर इंडिगो एअरलाईन्सचा 1 शेअर 700 रुपयांना तर कोटक बँकेचा 1000 ला, एशियन पेंट्सचा 1120 रुपयांना, तर बजाज फायनान्सचा 2000 रुपयांस मिळत होता. एखाद्या व्यक्तीने जर दहा हजार रुपये कोणत्याही एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवायचे ठरवले असते तर त्याला आरकॉमचे 1000 शेअर्स घेता आले असते तर इंडिगोचे 14, कोटक बँकेचे 10, एशियन पेंट्सचे 8, तर बजाज फायनान्सचे केवळ पाचच. परंतु आज त्याच दहा हजार रुपयांची किंमत एकीकडे असती 5000 रु. तर दुसरीकडे अनुक्रमे रु. 29,020, 18,340, 27,790 व 36,520 असली असती. (दि. 5 , शुक्रवार अखेर) त्यामुळे भाव कमी आहे म्हणून शेअर्सची खरेदी करण्यापेक्षा तीच उत्तम कशी ठरेल याचा विचार करावा व योग्य संधीची वाट पहावी. प्रत्येक गोष्टीची एक अंगभूत किंमत किंवा एक आंतरिक मूल्य असते (खपीींळपीळल तरर्श्रीश). मागील आठवड्यात डीमार्टमध्ये खरेदी करताना ओले खोबरे व चॉकलेट असे कॉम्बिनेशन असलले बाऊंटीचे चॉकलेट हे एकावर एक मोफत मिळत होते आणि मी ते लगेच खरेदी केले अर्थातच एक्स्पायरी डेट, पॅकिंग, इ. गोष्टी तपासूनच, कारण ते चॉकलेट त्यापेक्षा कमी किंमतीत न मिळण्याची शक्यता. दुसरे उदाहरण बाटाचे घेता येईल. जेन्युईन लेदर शूजचे एक बेसिक मूल्य बहुतेक प्रत्येक पुरुषास माहीत असते तरी काही लोकांना तसे शूज अगदी किरकोळ भावात हवे असतात जे केवळ जुन्या बाजारातच मिळू शकतात परंतु ते किती टिकतील याची शाश्वती नसते हे देखील समजून घ्यायला हवे.आपले हित कशात आहे यापेक्षा काय स्वस्त मिळतेय याबाबत मानवी स्वभाव जास्त चिकित्सक होताना दिसतो. अलीकडच्या पडझडीतसुद्धा बाजाराचे निर्देशांक ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत अजूनही किंचित अधिमूल्यांकित आहेत परंतु ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत अशा बर्‍याच कंपन्या सध्या आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध आहेत.

बहुतेक गुंतवणूकदारांचा लाडका असलेला रेश्यो म्हणजे पीई रेश्यो. हा रेश्यो, कंपनीचे प्रति शेअर उत्पन्न व त्या कंपनीच्या एका शेअरचा भाव यामधील गुणोत्तर दाखवतो म्हणजे एका कंपनीचे प्रति शेअर उत्पन्न जर 25 असेल व त्याचा भाव जर 100 असेल तर त्याचा पीई रेश्यो हा 100/25 म्हणजे चार येतो. प्रचलित बाजार भावात त्या अमूक एका कंपनीचा शेअर किती पट महाग आहे याचा अंदाज या रेश्योवरून येतो. दुसर्‍या भाषेत, एक रुपया कमावण्यासाठी किती रुपये लावावे लागतील याचे गणित हा पीई रेश्यो मांडत असतो. 5 वर्षांची ऐतिहासिक पी/ई सरासरी हा कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करण्याच्या मुख्य निकषांपैकी एक असू असते. तथापि, ’पडती सुरी पकडायचा प्रयत्न करू नये’ या चायनीज म्हणीनुसार आणि कंपन्यांच्या उद्योगांची गतिशीलता व इतर मूलभूत बाबी समजून घेण्यासाठी अधिक संशोधन करणं आवश्यक आहे. गुंतवणूकीचा सुवर्ण नियम म्हणजे कंपन्यांच्या आंतरिक मूल्याच्या तुलनेत आकर्षक स्तरावर व्यवहार करणार्‍या शेअर्समध्ये पैसे लावणे, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना दीर्घ अवधीत त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो.

-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply