Breaking News

खालापूर-खोपोली मार्गावरील झाडे ऐन पावसाळ्यात सुकली; ठेकेदाराचा बनाव उघड

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली ते खालापूर  या आठ किमी अंतराच्या टप्प्यात ठेकेदाराने लावलेली झाडे ऐन पावसाळ्यात सुकली असून, त्यांना टेकू देण्यासाठी वापरलेल्या फक्त काठ्या शिल्लक राहिल्या असल्याचे चित्र आहे. खोपोली ते खालापूर या रस्त्याचे तीन वर्षापुर्वी रुंदीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना तोडलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याची शासनाची नियमावली आहे. मात्र त्याचा संबंधीत ठेकेदाराला पुर्णपणे विसर पडला. त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध होताच रस्ते विकास महामंडळ आणि या मार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराने तीन वर्षे रखडलेल्या मार्गावर झाडांच्या रोपांची लगवड केली. खोपोलीतील केएमसी महाविद्यालयासमोर तर ठेकेदाराने चक्क झाडांच्या फांद्या महामार्गाच्या दुभाजकामध्येे लावल्या. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा बनाव उघडकीस आणल्यानंतर ठेकेदारची भंबेरी उडाली. या बनावाचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने ठेकेदाराला वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले. मात्र ठेकेदाराने बिजातून कोंब फुटलेली रोपे नुकतीच लावली.  ती ऐन पावसाळ्यात सुकून गेली असून तेथे फक्त टेकू देण्यासाठी वापरलेल्या काठ्या शिल्लक राहिल्या असल्याचे दिसून येत आहे. अगदी कमी वयाच्या रोपांची लागवड केल्याने ही अवस्था झाल्याचे खालापुरातील जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याच्या कामाआड येणार्‍या वड, पिंपळ तसेच आंबा, जांभूळ, बोर, नारळ अशा फळझाडांची तोड करण्यात आली मात्र त्याबदल्यात शोभेच्या फुलांची व रानटी झाडे लावण्यात आली, हे चुकीचे आहे, असे खालापूर पंचायत समितीचे उपसभापती शामसुंदर साळवी यांनी सांगितले.

खोपोली-खालापूर या मार्गाच्या दुभाजकामध्ये तीन वेळा झाडे लावली, मात्र ती जगली नाहीत. पुन्हा झाडे लावण्यात येत आहेत. वृक्षतोड केलेल्या झाडांच्या बदल्यात शेडवली पाणीपुरवठा योजनेशेजारी व शिळफाटा येथील फॉरेस्ट चेकनाक्यासमोर वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

-नजिम खान, ठेकेदार

लागवड केलेली रोपे करपली असतील तर पाहणी करून ठेकेदाराला जाब विचारु. तसेच पाच वर्षे वयाची व कोणती झाडे लावावीत, अशी काही नियमावली आहे का, हे तपासून पहावे लागेल.

-श्री. सोनावणे, मुख्य अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे विभाग

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply