नवी मुंबई : बातमीदार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 9) नवी मुंबईत उत्साहात पार पडला. या निमित्ताने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान व अतिद्रिंय शक्तीचे प्रयोग हे कार्यक्रम पार पडले.
अॅड. तृप्ती पाटील यांनी जादूटोणाविरोधी कायदा हा कोणाच्याही शोषणमुक्त धार्मिक आचरणाला बाधा आणत नाही असे सांगितले. अमानुष, अनिष्ट व समाज स्वाथ्याला घातक अशा धार्मिक रूढी व परंपरांना हा कायदा अटकाव करतो. या कायद्याचा प्रचार व प्रसार जाणिवपूर्वक केल्यामुळे महाराष्ट्रत कोणीही बाबा-बुवा चमत्कार करण्याचा दावा करत नाही. हे या कायद्याचे यश आहे. महा. अंनिस. ही पुरोगामी विचार पेरणारी संघटना आहे. या पेरणीचे फलित हा कायदा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मा. प्रा. मच्छिद्रनाथ मुंडे यांनी अतिद्रिंय शक्तीचे जे दावे केले जातात ते निखालस फसवे दावे असतात असे प्रतिपादन केले. मिड ब्रेन क्टिव्हिटी म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तक वाचन केले जाते ही फसवणूक आहे.
डोळ्यावर पट्टी बांधल्यावर खालच्या पापणीखाली छोटीशी फट राहते त्यातून खालचे स्पष्ट दिसत असते त्यामुळे ती व्यक्ती डोळ्यावर पट्टी बांधल्यावरसुध्दा पुस्तक वाचू शकते. जर मिड ब्रेन क्टिव्हिटी खरी असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी न बांधता अंधारात पुस्तक वाचायला पाहिजे. सरांनी अतिद्रिंय शक्तीचे विविध प्रयोग दाखवून त्यामागचे तंत्र समजावून सांगितले.
मा. सुशिला मुंडे यांनी संघटनेच्या वाटचालीचा धांडोळा घेतला व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व मधुकर राऊल यांचे मोलाचे सहकार्य वर्धापनदिन साजरा करायला लाभले.