नवी मुंबई : बातमीदार
नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनार्यांसह, कोळीवाड्यांत गुरुवारी (दि. 11) मोठा उत्साह पाहायला मिळाला. सरसोळे जेट्टी दिवाळे, ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, घणसोली कोळीवाडा, बेलापूर गावासह समस्त कोळीवाड्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
दिवाळे, सारसोळे कोळीवाडा येथून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीत सोन्याचा नारळ ठेवून वाजतगाजत पालखी खाडीच्या दिशेने रवाना झाली. कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांचे पारंपरिक पेहराव, दागिने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या वेळी आगरी कोळी समाजात प्रसिद्ध असेलेल्या ब्रास बँड पथकाने आपली पारंपरिक गिते वाजवात सोहळ्यात लज्जत आणली होती. पारंपरिक संगीताच्या तालावर महिला, महिला, मुलांनी ठेका धरला.
सणासाठी खाडीजवळील जेट्टीच्या परिसराची साफसफाई करण्यात आल्याने जेट्टीला नवीन रूप आले होते. गुरुवारू दुपारी नारळाची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. कोळी समाजातील पुरुष, महिला आणि लहान मुले पारंपरिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सरसोळे, वाशी, दिवाळे, शिरवणे, दिवा, घणसोली ऐरोली या ठिकाणी ही मिरवणूक काढण्यात आली होती.
सरसोळेच्या नारळी पोर्णिमेला नवी मुंबईतील सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. नेत्यांनी देखील कोळी समाजाची पारंपरिक टोपी परिधान केली होती. काहींनी ब्रास बँड पथकाच्या तालावर ठेकादेखील धरला.