स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या बैठकीत निर्णय
नवी मुंबई : बातमीदार
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्साही सहभाग घेऊन घरोघरी तिरंगा फडकविला, विविध उपक्रम राबविले. हीच राष्ट्रप्रेमाची भावना यापुढील काळातही तशीच कायम राहील हा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ व सुंदर शहर ही नवी मुंबईची सर्वदूर ओळख आहे, ती कायम राखण्यासाठी नागरिकांनी घरातूनच कचर्याचे ओला, सुका आणि घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण करण्याचा ठाम निश्चय केला पाहिजे, तशी शपथ घेतली पाहिजे व ही दैनंदिन सवय लावून घेतली पाहिजे, असे आवाहन नागरिकांना केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नमुंमपा मुख्यालयात आयोजित ‘अमृत सोहळा स्वातंत्र्याचा’ या विशेष कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले आणि इतर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेसबुक आणि यू ट्युब लाईव्ह वरून अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन अनुभव घेतला.
कोणतेही अभियान यशस्वी करण्यात नवी मुंबईकर नागरिक आघाडीवर असतात म्हणूनच स्वच्छतेची एवढी मानांकने आपण मिळवू शकलो असे सांगतानाच ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी नागरिकांचा स्वच्छतेप्रती संपूर्ण व सक्रिय सहभाग मिळणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्वच्छेतबाबत सोसायट्यांनी अधिक जागरूक राहून दैनंदिन कचर्याचे तीन प्रकारे वर्गीकरण झाल्याशिवाय कचरा सोसायटीबाहेर जाणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावी असे सूचित करतानाच स्वच्छतेविषयी टिकाटिप्पणी करताना त्या व्यक्ती अथवा संस्थेने कचरा वर्गीकरणाबाबत आपण स्वत: किती कृतीशील आहोत असा प्रश्न स्वत:ला; विचारावा असे आयुक्तांनी सांगितले. कचरा वर्गीकरण ही घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाची बाब असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने माझ्याकडून 100 टक्के वर्गीकरण झालेच पाहिजे असा निश्चय प्रत्येकाने आजच्या स्वातंत्र्यदिनी करावा असे आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले.
स्वच्छ सर्वेक्षणाची घोषणा केंद्र सरकारमार्फत 2 ऑक्टोबरला केली जात असली तरी आपण मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची सुरूवात 15 ऑगस्टला केली होती व यावर्षी तर त्याआधीच केली आहे. पंतप्रधान महोदयांनी स्वच्छता अभियान वॉर्ड पातळीवर राबविले जावे या व्यक्त केलेल्या अपेक्षेची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आपण मागील वर्षीपासूनच सुरू केली असून यावर्षी त्या विभाग पातळीवरील स्पर्धेला अधिक सुनियोजित रूप दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. या स्पर्धेला आपण ‘स्वच्छ मंथन’ असे नाव दिले असून यामधून विभागाविभागांमध्ये स्वच्छताविषयक अधिक चांगले काम करण्याची निकोप स्पर्धा होईल आणि याचा एकत्रित परिणाम शहर स्वच्छतेची गुणवत्ता उंचावण्यावर होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
या वेळी ‘स्वच्छ मंथन 3.0’ च्या पहिल्या टप्प्यातील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या विभागांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक संपादन करणार्या वाशी विभाग कार्यालयास ‘स्वच्छ मंथन फिरता चषक’ आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या चषकावर पहिल्या टप्प्यातील विजेते म्हणून वाशी विभाग कार्यालयाचे नाव कोरण्यात आलेले असून 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार्या दुसर्या टप्प्यात अशीच सर्वोत्तम कामगिरी करून हा फिरता चषक स्वत्:कडे राखण्याची जबाबदारी वाशी विभागाची असल्याची जाणीव या वेळी करून देण्यात आली. पहिल्या फेरीत नेरूळ व घणसोली हे दोन विभाग अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकाने मानांकित घोषित करण्यात आले.
या वेळी नमुंमपा शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचेही पारितोषिक वितरण झाले. या स्वातंत्र्याच्या अमृत सोहळ्यात अमृत गायन स्पर्धेचे विजेते अमोल चव्हाण तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचा गानसमुह यांनी राष्ट्रभक्तीपर गीतरंग तसेच नमुंमपा कर्मचारीवृंदाने देशभक्तीपर गीतनृत्याविष्कार सादर केला. नमुंमपा शाळा क्र. 92, कुकशेत यांच्या दिंडी सादरीकरणाला व त्यातील किर्तनकार मनिष गजमल याच्या सादरीकरणाला आयुक्तांसह सर्व उपस्थितांनी विशेष दाद दिली. ऋतुजा पाटील या कोपरखैरणे शाळेतील चिमुरडीचे ‘माझ्या स्वप्नातील भारत’ विषयावरील खणखणीत भाषण टाळ्यांच्या गजरात नावाजले गेले.
स्वच्छ मंथन स्पर्धा उत्साहात
स्वच्छ मंथन स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धात्मक चुरशीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले, तसेच स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचा चांगला सहभाग लाभला याचा विशेष उल्लेख आयुक्तांनी केला. यामध्ये 100 टक्के वर्गीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करीत यामध्ये सोसायट्यांनी कचरा वर्गीकरणाची गरज समजून पुढाकार घेतला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी मांडली. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांनी या अनुषंगाने असे काही इतरांपेक्षा अनोखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत ज्याचे अनुकरण इतरांनी केले पाहिजे अशी अपेक्षा आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केली.