Breaking News

रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट

एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ

श्रीवर्धन ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात गुरुवारी (दि. 18) संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री मंदिराच्या जवळच समुद्रामध्ये गुरुवारी सकाळी एक बेवारस बोट स्थानिक नागरिकांना आढळून आली. या बोटीबाबत स्थानिकांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. या वेळी या बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये तीन एके 47 गन, जिवंत काडतुसे तसेच काही कागदपत्रे आढळून आली.

हाय अलर्ट जारी :

कोकणचा किनारा नेहमीच संवेदनशील राहिलेला आहे. मुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शस्त्रास्त्रे श्रीवर्धन तालुक्यातीलच शेखाडी बंदरात उतरविल्याचे नंतर उघड झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या तालुक्यात गोपाळकाल्याच्या आदल्या दिवशी संशयास्पद बोट व हत्यारे आढळल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करीत आहेत.

मुंबई, पुण्यातही नाकाबंदी

रायगड जिल्ह्यात संशयास्पद बोट आढळल्याने रायगडसह मुंबई आणि पुण्यातदेखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाकाबंदी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी रायगडातील घटनेची दखल घेत तातडीची बैठक बोलावली आहे.

‘ती’ बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

मुंबई ः  श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे आढळलेल्या संशयास्पद बोटीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत माहिती दिली. ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिक महिलेची असून या बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनार्‍यावर तरंगत आली असल्याचे
त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, आज हरिहरेश्वरच्या समुद्रकिनार्‍यावर एक 16 मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली असता या बोटीत तीन एके-47 रायफल, काडतुसे तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. याची माहिती भारतीय कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांनाही देण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले, मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडीहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन हाना लॉडर्सगन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती, मात्र बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. समुद्र खवळला असल्याने बोटीच्या मालकाने ती टो केली नाही. त्यामुळे ती बोट वाहत श्रीवर्धन समुद्र किनार्‍यावर आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply