Breaking News

शरदराव! ‘कृष्ण’ बनू शकत नाहीत, निदान ‘मोहन’ (धारिया) तरी बना!!

भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70च्या दशकात खरा राजकारणी पहायला मिळाला तो शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या रुपाने. तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, डॉ. मनोहर जोशी हेही चाणक्य म्हणवले जात होते पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि डॉ. मनोहर जोशी हे ‘आता उरलो मी मार्गदर्शनापुरता’ या भूमिकेत आहेत. पण आता सक्रीय राजनीतिमध्ये चार चाणक्यांपैकी उरलेत ते केवळ आणि केवळ शरदचंद्र गोविंदराव पवार. अर्थात असे दहा शरद पवार मागे टाकून पुढे जाणारा नवा चाणक्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या रूपाने पुढे आला आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे दोन चाणक्य सध्या जोरात आहेत. पण आपण विचार करतोय तो 70च्या दशकात निर्माण झालेल्या चाणक्य शरदचंद्र पवार यांचा.

यदा यदा ही धर्मस्य

ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थातमअधर्मस्य

तदात्कानम् सृजान्महम

परित्राणाय साधूनाम्

विनाशाय च दुषकृताम

धर्म संस्थापनार्थाय

संभवामि युगे युगे॥

धर्माला ग्लानी आली, धर्म संकटात आला तर दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करून तो पुनर्स्थापित करण्यासाठी भगवान विष्णू पुन्हा अवतार घेईल, असा सार भगवान श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराने म्हटले आहे. महाभारत झाले आणि महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश सांगितला ती होती 18 अध्यायांची श्रीमद्भगवद्गीता. यात भगवान श्रीकृष्णाने राजकारण काय असते ते समस्त ब्रह्मांडाला दाखवून दिले.

भगवान श्रीकृष्णाने धर्म, सत्य आणि सत्कर्मासाठी राजनीति केली पण राजकीय पंडितांनी किंबहुना पवार विरोधकांनी शरदरावांच्या नावापुढे कुटील, कपटी, कावेबाज, धूर्त, मुरब्बी अशी विशेषणे लावलीत. पवार धूर्त आहेत, मुरब्बी आहेत यात वादच नाहीत पण कुटील, कपटी, कावेबाज कसे?

महाराष्ट्राचे थोर सुसंस्कृत, शालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी एक तरूण हुशार मुलगा राजकारणात आणला. यशवंतरावांनी आपल्या परिवारातील कुणालाही राजकारणात आणले नाही. पण जो मुलगा राजकारणात आणला त्याचे नाव शरद. हेच आपले शरदचंद्र पवार. वयाच्या अवघ्या तिशीत शरदराव हे महाराष्ट्राच्या राजकारणात आले. इंदिरा गांधींना आणीबाणी लादली होती आणि त्यावेळेस तरूण तुर्क चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत या काँग्रेसी नेत्यांनी इंदिराजींना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला पण इंदिराजींनी तो न मानता चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत यांना तुरुंगात डांबले. अनभिषीक्त सम्राज्ञी इंदिराजींनी 1977 च्या प्रारंभी आणीबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या आणि देशाच्या राजकीय क्षीतीजावर जनता पार्टी जी भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, समाजवादी आणि संघटना काँग्रेस अशा चार पक्षांची जन्माला आली. मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांतही या जनता पार्टीचे भाग बनले नव्हे केवळ भागच नाही तर या जनता पार्टीचे नेतृत्वही चंद्रशेखर यांनी केले. याचवेळी महाराष्ट्रात वसंतराव बंडुजी पाटील म्हणजेच वसंतदादा आणि नाशिकराव तिरपुडे यांचे मंत्रिमंडळ होते आणि शरद पवार हे या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. पण राजकारणाची दिशा कशी ओळखावी याचे बाळकडू मिळालेले शरद पवार यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनता पार्टीत, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यावेळी वृत्तपत्रांत आणि राजकीय वर्तुळात ‘शरद पवारांनी दादांच्या (वसंतदादा) पाटील खंजीर खुपसला’ असा वाक्प्रचार वापरण्यात आला होता. अर्थात दोन वर्षापूर्वीच्या एका दिवाळी अंकात एक लेख प्रसिद्ध झाला त्यात यशवंतराव व शरदराव यांच्या निकटवर्तीयाने शरदरावांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता तर शरद पवारांना दादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून पुलोद स्थापन करण्यात यशवंतरावांची फूस होती असे नमूद केले होते. आता यशवंतरावही नाहीत आणि ते लेखकही नाहीत, आहेत ते केवळ चाणक्य शरद पवार.

शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची ती पहिली वेळ. यशवंतराव आणि वसंतदादाही काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे निष्ठावान केवळ इंदिरा गांधींच्या पाठीशी होते. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदेही काँग्रेसला रामराम ठोकणार्‍यांमध्ये होते. यशवंतराव चव्हाणांनी मनाचा मोठेपणा दाखवून लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर मिळत असलेले पंतप्रधानपद इंदिराजींच्या ‘हाती’ सुपूर्द केले, अन्यथा इतिहास बदलला असता. पण पंतप्रधान न बनलेले यशवंतराव उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. ज्या इंदिराजींच्या हाती यशवंतरावांनी पंतप्रधानपद सुपूर्द केले त्याच इंदिराजींनी यशवंतरावांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी ताटकळत ठेवले होते हा इतिहास कोणी विसरलेले नाही आणि यशवंतरावांच्या चुका दुरूस्त करून पुढे निघालेले त्यांचे मानसपुत्र शरदराव यांनी राजीव गांधींना औरंगाबादेत बोलावून जाहीर सभेत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला. त्यावेळी राजीव गांधींचे हितचिंतक त्यांना सांगत होते की शरदरावांना पक्षात घेऊ नका पण राजीव गांधी यांनी पक्षात सामावून घेतले. म्हणूनच कदाचित आता राजीव गांधींचे समर्थन राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांकापेक्षा जास्त शरदराव करीत असावेत. तसे राजीव गांधी हे खरे अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणावे लागतील. कारण राजीव गांधी यांचा पिंड हा राजकारणी नव्हता पण संजय गांधींच्या अपघातामुळे राजीव गांधींना इंदिराजींनी पुढे आणले (अनेक निष्ठावंत कार्यकर्ते, नेते पक्षात असले तरी).

शरदराव पवार यांनी औरंगाबादेत काँग्रेस प्रवेश केल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर त्यांचा 25 जून 1988 रोजी राज्याभिषेक झाला. काय योगायोग पहा. आणीबाणी 25 जून 1977 ला लागली आणि त्याच्या बरोबर अकरा वर्षांनी पुन्हा दुसर्‍यांदा शरदराव मुख्यमंत्री बनले. सलग पाच वर्षे शरदराव मुख्यमंत्री कधीच राहू शकले नाहीत. जरी त्यांनी चारवेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले असले तरी. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द किती काळाची होती हे पहायला गेलो तर पहिल्यांदा 18 जुलै 1978 रोजी पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झालेले शरदराव 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिराजींच्या फटक्याने सरकार बरखास्त झाल्यामुळे पायउतार झाले.

25 जून 1988 रोजी काँग्रेसी मुख्यमंत्री झालेले शरदराव विधानसभेच्या निवडणुकांमुळे 3 मार्च 1990 आणि 4 मार्च 1990 ते 25 जून 1995 असे या पदावर राहिले. 1962 साली पंडितजींच्या मदतीसाठी हिमालयाच्या मदतीला यशवंतरावांचा सह्याद्री धावून गेला. तद्वतच 1995 साली पामल्ला वेंकट नरसिंहराव यांच्यासारख्या प्रकांडपंडित पंतप्रधानांच्या संरक्षणा(मंत्री)साठी यशवंतरावांचा हा मानसपुत्र शरद पवार केंद्रात गेले. पण सुधाकरराव नाईक महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी होते आणि शरदराव केंद्रात रक्षामंत्री होते तेव्हा 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरीचा विवादास्पद ढाचा पडला. महाराष्ट्रात 1990 साली शिवसेना-भाजप युती फॉर्मात होती आणि बाबरी पतनानंतर देशभरात दंगली उसळल्या. सुधाकरराव नाईकांनी महाराष्ट्रात अनेकांच्या आवळलेल्या नाड्या शरदरावांना खटकत असल्यामुळे दंगल नियंत्रणात आणू शकत नसल्याचा आरोप ठेवून शरदराव महाराष्ट्रात आले. 6 मार्च 1993 रोजी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले काँग्रेसचेच. पण अवघ्या सहा दिवसात 12 मार्च 1993 रोजी यशवंतरावांच्या जयंतीदिनी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले. चाणक्य शरद पवारांनी 13 बॉम्बस्फोट झाल्याचे सांगून तेरावे नाव मशिदींचे टाकले. 1995 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती. 45 अपक्ष आमदार ज्यात पवार विरोधाची मजबूत फळी यामुळे 14 मार्च 1995 रोजी डॉ. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या पक्षाने कोणता उमेदवार उभा करायचा ही कलासुद्धा शरद पवारांच्या अंगी असल्याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये सुरु असे. विधानपरिषदेत प्रमोद नवलकर विरोधी पक्षनेते होणार असताना मखराम पवार आणि त्र्यंबक मारूती उर्फ टीएम कांबळे या दोन आमदारांना असंस्कृत घोषित करण्यात येऊन रा. सू. गवई यांना विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांनी मिळवून दिले तेव्हा शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी, हे कसले विरोधी पक्षनेते? हे तर सरकारमान्य विरोधी पक्षनेते? असे उद्गार काढले होते.

लातूर किल्लारीचा भूकंप आला तेव्हा भूकंपावर चर्चा होत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुधीर भाऊ जोशी यांनी, पाहा  शरदराव काय काम मॅनेज करू शकतात. महाराष्ट्राचा नकाशा जर पहिला तर बारामती हा भूकंपप्रवण भाग नाही. म्हणजे जो माणूस भूकंपसुद्धा मॅनेज करू शकतो तो माणूस काय काय नाही मॅनेज करू शकणार? असा खडा सवाल करून पवारांची खासियत सांगितली होती. एखादा उमेदवार उभा करायचा आणि त्याच्यासमोर दुसरा उमेदवार पण आपणच टाकून अधिकृत उमेदवाराचे बारा वाजवायचे हे शरद पवारच करू शकतात अशी चर्चा महाराष्ट्रातले राजकारणी करीत असत.

मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे नवी दिल्लीत श्रेष्ठींकडे कागाळ्या करणार्‍यांचा पत्ता कसा कापायचा याचे तर किस्से भरपूर मिळतील  पण एकदा एका नेत्याचे नाव मंत्रीपदासाठी घेतले जात होते. आणि अचानक मंत्रिमंडळाच्या यादीतून ते नाव गायब झाले. विधानभवनात प्रा. मधू दंडवते यांना ते नेते भेटले आणि आपली कैफियत मांडू लागले तेव्हा प्रा. मधू दंडवते यांनी त्या नेत्यास विचारले की,तुम्हाला शरद पवारांनी सांगितले तेव्हा त्यांनी सफारी परिधान केला होता का? तो नेता हो म्हणाला. पण विचारले का? तेव्हा प्रा. मधू दंडवते यांनी सांगितले की, सफारीला चार खिसे असतात. आणि प्रत्येक खिशात वेगवेगळी यादी असते. तुम्हाला यादी दाखवली ती कोणत्या खिशातली, प्रा. मधू दंडवते यांच्या किश्श्यावर तो नेता  पाहतच राहिला. असे अनेक नेत्यांना ‘पहातच’ ठेवण्याचे काम झालेले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यावर जातीयवादी धर्मांध असा आरोप करणार्‍या शरदरावांनी यांची साथ कितीवेळा आणि कुठे कुठे घेतली हे काही लपून राहिलेले नाही.1978 संघ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळ बनवणारे शरद पवार हे वाजपेयी पंतप्रधान असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून लाल दिव्याची गाडी लेवून वावरत होते. 2014 साली न मागता देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देणे हा इतिहास सर्वश्रुत आहे.

1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळचा मुद्दा काढून शरद पवार, पी. ए.  संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण 1999 ते आजतागायत त्यांनी सोनिया-राहुल यांनी साथ सोडलेली नाही. मग सत्ता असो की विरोधी पक्ष. वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या उद्घाटनाला सोनिया गांधी आल्या होत्या आणि त्यांना खूष करण्यासाठी शरद पवारांनी राजीव गांधींचे नाव सागरी सेतूला सुचविले आणि याबाबतच्या ठरावाची फाईल मंजूर करण्याचे आदेशही दिले. का? राजीव गांधींच्या शिवाय मुंबईत कोणत्या मान्यवरांचा जन्म झाला नव्हता? निव्वळ गांधी परिवाराचे प्रेम? असे सवाल पुढे केले होते. भूखंडाचे श्रीखंडचा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला. आणि ते का छगन भुजबळ यांनी या भूखंडाच्या श्रीखंडाचे राज ठाकरे यांचे व्यंगचित्र सभागृहात झळकवले, हेच शरद पवार, मृणाल गोरे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे एकत्र यावेत हीच तर पवारांची किमया.

आयुष्यभर काँग्रेसला शिव्या घालणारे नेते हातात ‘हात’ घेऊन चालतात तेव्हा निष्ठा, नाव हे शब्द मागे पडतात. घराणेशाहीचा आरोप कुणीही कुणावर करू शकत नाही पण स्वतःचे ‘सांभाळण्या’साठी दुसर्‍याला तरी कमी लेखू नको. नाही नाही म्हणता पार्थला मैदानात उतरविले आता रोहितही उतरणार मग रणजितसिंह मोहितेपाटील, डॉ. सुजय विखेपाटील यांनी काय घोडे मारले. आपला तो बाबा आणि दुसर्‍याचे ते कार्ट, अशी निदान तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही. शेतकर्‍यांचे दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा ज्या राष्ट्रीय आपत्तीत सरकारला योग्य सल्ले देण्यासाठी पुढे यावे ही अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने केली तर ते चुकीचे निश्चित ठरणार नाही. चंद्रशेखर आणि मोहन धारिया हे आपले मित्र होते. मोहन धारियांनी केलेले ‘वनराई’चे काम, अमरीश पटेल यांचे शिरपूर पॅटर्न, अर्जुन खोतकरांचे जालनातले काम पहा. अशी असंख्य कामे महाराष्ट्रात झाली आणि होत आहेत. विधायक चळवळीचा इतिहास पोपटराव पवारांनी पण दाखवलाच. सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची कामे पुढे आणि मोहन धारिया यांचे वनराईचे काम आणि भंवरलाल गांधी यांच्यासारख्या खानदेशातल्या भागीरथाचे काम पाहिल्यानंतर फालतू टग्गेटोणगे यांचे राजकारण करण्याऐवजी शरदराव! तुम्ही भगवान श्रीकृष्ण बनू शकला नाहीत पण शकुनी तरी बनू नका. निदान श्रीकृष्णाचे नामसाधर्म्य असलेले मोहन (धारिया) तरी बना. महाराष्ट्र निश्चित देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अर्थात आता हे काम देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने पुढे नेतील. निदान धारिया ‘राज’नीतीतून तरी बाहेर या!!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply