Breaking News

एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेची रविवारी पनवेलमध्ये अंतिम फेरी

मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी येत्या रविवारी (दि. 28) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता, तर बक्षीस वितरण सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांची आणि सन्माननीय अतिथी म्हणून अभिनेते पृथ्वीक प्रताप, भरत साळवे यांची उपस्थिती असणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ असे ब्रीद घेत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन केले जाते व कलाकारांच्या अविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात. त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply