पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅनालिटीकल इन्स्ट्रूमेंटेशन या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ बुधवारी (दि. 24) करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील उपस्थित होते, तसेच विज्ञान शाखा प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. वी. जाधव यांनी उपस्थिती दर्शविली. प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि त्यामुळे त्यांना औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी कसा फायदा होईल याबाबतीत माहिती दिली.
विज्ञान शाखा प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर यांनी या अभ्यासक्रमातील अंतर्भाव घटकांबाबत माहिती दिली. या अभ्यासक्रमात गॅस क्रोमॅटोग्राफी, एचपीसीएल, एफटीआयआर, एएएस यांसारख्या अत्याधुनिक उपकरणे, तसेच क्वॉलिटी कंट्रोल, लॅबॉरेटरी मॅनेजमेंट, लॅबॉरेटरी सेफ्टी याचे प्रशिक्षण समाविष्ट केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. सपना चिलाटे यांनी केले, तर विज्ञान संसाधन केंद्राचे समन्वयक महेश भंडारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.