पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवारी (दि. 28) आयोजित बैठकीत आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ज्यांनी ज्यांनी या नामकरणासाठी समितीला पाठिंबा दिला त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानण्यात येणार आहेत.
नवी मुंबईच्या विकासात असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान आणि स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास जुलैमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नामकरणाचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला.
याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीकडून आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, सरचिटणीस भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, सदस्य संतोष केणे, दशरथ भगत, राजेश गायकर, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, नंदू ठाकूर, विजय गायकर आदी उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समितीने व्यापक लढा उभारून आंदोलने केली. त्यास ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला होता ते सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे व संघटनांचे अध्यक्ष आणि हा ठराव मांडण्यासाठी पुढाकार घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्वांचे लेखी पत्र देऊन समितीकडून आभार मानण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अधिवेशनात मंजूर ठरावाला केंद्र सरकारने मंजुरी देऊन नामकरणावर शिक्कामोर्तब करावे यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली जाणार आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …