पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांचे हस्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मधील पोलीस कुटुंबांना शुक्रवारी (दि. 24) कोरडा शिधाचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, यामुळे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी महिनाभर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. परिमंडळ-2 मधील पोलीस कर्मचारी आदिवासी वाड्यांवर जाऊन त्यांना धान्य वाटप करीत आहेत. अनेक गरजू आणि रस्त्यात अडकलेल्या नागरिकांना खाण्यासाठी अन्नाची पाकिटे देऊन त्यांची भूक भगवीत आहेत. नाका बंदी, गस्त घालीत असताना प्रसंगी त्यांना कडक भूमिका घ्यावी लागत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास ही वेळ मिळत नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी त्यांची अडचण ओळखून पोलीस कर्मचार्यांना आयुक्तालयाचे वतीने लोकसहभागातून कोरडा शिधा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, डाळ, तेल आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. शुक्रवारी पनवेल येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 च्या कार्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात काही कर्मचार्यांना आयुक्त संजय कुमार यांचे हस्ते त्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उपायुक्त अशोक दुधे, सुरेश मेंगडे, शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.