पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर गाडी सोडली
माणगाव ः प्रतिनिधी
या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे सोमवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी (दि. 6) चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. माणगांव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी व रेल्वेचे दार न उघडल्याने अनेकांना आरक्षण असूनही रेल्वेमध्ये चढणे अशक्य झाले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी जबलपूर एक्स्प्रेस रेल्वे रुळावर उतरून रोखली. माणगाव रेल्वे स्थानक येथे सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास वापी गाडी थांबली, परंतु रेल्वेमधील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाही. त्यामुळे सुरत-वापी आरक्षण असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमध्ये चढता आले नाही. त्यामुळे त्यांनी एक्स्प्रेस समोर उभे राहून रेल रोको केला. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सपोनि. लहांगे आपल्या टीमसह तातडीने दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीने स्टेशन मास्तरसोबत बोलून प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था 6.25 वा. च्या गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. थांबा नसतानाही पोलिसांच्या मागणीनंतर ही रेल्वे माणगांव येथे थांबविण्यात आल्याचे स्टेशन मास्टरांनी सांगितले.