Breaking News

पाली, रोहा, सुधागड, खालापुरात तुफान पाऊस

जनजीवन विस्कळीत; वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार

पाली : प्रतिनिधी

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 7) सायंकाळी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासनतास कोसळणार्‍या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा गारवा दिला. सर्वत्र ढग दाटून आल्याने तसेच विजबत्ती गुल झाल्याने अंधाराचे सावट पसरले. सुधागड़ तालुक्यातील काही गावांना वादळी वार्‍याचा फटका बसला. जोराचा वारा असल्याने ठिकठिकाणी  मोठमोठी झाडे पडली. काही झाडे वीजवाहिन्यांवर  पडल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अनेक वाडी, वस्त्यावरील वीज गायब झाली आहे. त्यामुळे सर्वत्र अंधार झाला. सुधागड तालुक्यात भालगुल, कानिवली, माणगाव बुद्रुक या गावांना दरडीचा धोका असल्याने येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आपले घर, सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीने घरात पाणी शिरणार नसल्यास घरात सुरक्षित राहावे, तसेच आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी अगोदरच सुरक्षित स्थळी न्यावेत, असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या बरोबरच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना व खबरदारी घेण्याचे आदेश पाली तहसीलदार रायन्नावार यांनी दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ मदत मागावी,  तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर पडू नये, स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड

मुरूड : बुधवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून मुरूड शहर व परिसरात विजेचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. मुरूड परिसरात मागील 15 दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. त्यामुळे लोकांना घामाच्या धारा लागल्या होत्या. कडक उन्हामुळे भातपिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला होता. मात्र बुधवारी  दुपारनंतर वातावरणात बदल झाला. विजेचा कडकडाट सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. या वेळी संपुर्ण तालुक्यात पाऊस झाला. त्यामुळे हवेत गारवा आला. शेतात झाल्याने शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रोहे : हवामान खात्याचा अंदाजानुसार बुधवारी (दि. 7) दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील नाले, ओढे पुन्हा वाहू लागले असून हवेत गारवा आला. या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोह्यातील नागरिक उकड्याने हैराण झाले होते. मात्र बुधवार दुपारपासूनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.  त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन, नागरिकांना उकाड्यापासून  दिलासा मिळाला. या वेळी रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बुधवार दुपारनंतर एक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी पडलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, ओढे, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणी साचले. हा पाऊस भातशेतीला चांगला व पोषक असल्याने रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत.

खालापूर : बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यात घुमशान घातले. जोराचा वारा व धो धो पाऊस यामुळे  विद्यार्थी व चाकरमान्यांना घरी परतताना  तारेवरची कसरत करावी लागली. मुंबई-पुणे महामार्ग तसेच बीएसएनएल खोपोली कार्यालयासमोर पाणी साठल्याने वाहन चालकांना वाहने थांबवावी लागली होती. रसायनी-दांडफाटा मार्गावर झाडांच्या फांद्या पडल्या. त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजूला केल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला झाला. तसेच खोपोली, खालापूर व वावोशी परिसरात बुधवारी संध्याकाळी तुफान पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply