पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील पाली शहरात भटक्या व पिसाळलेल्या जखमी कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. पालीतील हटाळेश्वर चौक, बाजारपेठ, एसटी बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ तसेच सर्व आळ्यांमधील विशेषत: कचरा कुंड्यांजवळ मोकाट कुत्र्यांचा झुंडीत वावर असतो. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन दिसले की, ही भटकी कुत्री थेट त्यांच्यावर धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांमध्ये अनेकदा भांडण जुंपते. त्यामुळे रस्त्यावरुन जाणार्या वाहनांना अपघात होण्याचा धोकादेखील वाढला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात आहे. मात्र त्याकडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालीत मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुले, वृद्ध व महिलांना या कुत्र्यांची जास्त भीती आहे. नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन लवकर उपाययोजना करावी.
-प्रकाश पालकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली, ता. सुधागड
भटकी कुत्री व मोकाट गुरे यांच्याबाबत पाली नगरपंचायत लवकरच उपाययोजना हाती घेणार आहे.
-विद्या येरूणकर, मुख्याधिकारी, पाली