खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ गुरुवारी (दि. 8) दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास कंटेनरने इर्टिगा कारला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. द्रुतगती मार्गावरून गुरुवारी दुपारी कंटेनर पुणे ते मुंबई असा जात होता. बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला व कंटेनरने समोर चाललेल्या इर्टिगा कारला पाठिमागून ठोकर दिली. त्यानंतर कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या वेळी कंटेनर चालक परशुराम कुंडलिक आंधळे (वय 24, रा. लिंबोडीकर ता. आष्टी, जि. बीड) याने गाडीतून उडी मारली मात्र तो तो गाडीखाली येत जागीच ठार झाला. पुढील तपास बोरघाट पोलीस करीत आहेत.
खोपोली बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा
गेल्या काही वर्षांपासून बोरघाटातील ढेकू गाव ते अफकॉन कंपनी खोपोली बायपास हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. या तीन किमी अंतराच्या मार्गावर मागील एक वर्षात 16 अपघात घडले आहेत. त्यात 26 जण दगावले असून 30 प्रवासी कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. त्याचप्रमाणे 32 वाहनांचा चुराडा झाला आहे.
हमरापूर उड्डाणपुलावर टेम्पोची ट्रेलरला धडक, 14 प्रवासी जखमी
पेण : परतीचा प्रवास करणार्या गणेशभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने गुरुवारी (दि. 8) पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील हमरापूर उड्डाणपुलावर ट्रेलरला धडक दिली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले. खेडवरून गणेशभक्तांना मुंबई सांताक्रूझकडे घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 43 बीपी 756) या गाडीने गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील हमरापूर पुलावर बंद पडलेल्या कॉईल ट्रेलर (एमएच 46 एआर 74)ला मागून धडक दिली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील 22 प्रवाशांपैकी चालक सागर गुरव (वय 31), प्रतिभा देवळे (वय 30), रंजना भुवड (वय 25), मीनल देवळे (वय 25), काशिनाथ देवळे (वय 50), सुरेश सखाराम नाचरे (वय 40), प्रवीण काशिनाथ नाचरे ( वय 34), मंगेश मधुकर देवळे (वय 41), स्वप्निला काशिनाथ देवळे (वय 47), संजना संजय पाटील (वय 34), समृद्धी संजय पाटील (वय 14), दीपक गंगाराम भुवड (वय 30), श्वेता सुनील भुवड (वय 35), संजना सुरेश नाचरे (वय 35) हे प्रवासी जखमी झाले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.