माणगाव : प्रतिनिधी
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माणगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडू नये, म्हणून महसूल खात्याकडून दक्षता बाळगण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. माणगाव तालुक्यात 7 व 8 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी काही दिवस कडक ऊन पडल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता. दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला होता त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. सध्या बहुतांशी शेतातील भाताचे पिक हे अर्धवट स्थितीत असून काही दिवसात ते पोटर्यात येणार आहे. त्यामुळे या पिकाला पावसाची आवश्यकता होती. गेल्या दोन दिवसांपासून भातपिकाला पोषक पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र जोरदार वार्यासह कोसळणार्या या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.