Breaking News

मतदाराच्या ‘आधारा’साठी रविवारी शिबिर

पनवेल : प्रतिनिधी

निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. 11) पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 इ नुसार फॉर्म नं. 6 ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून लागू झालेली आहे. मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांना मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत.  विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांशी ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे, हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरुन आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे, हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे, असल्याचे  आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, मतदारांना ऑनलाइन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब एनव्हीएसपी, व्हीएचए या माध्यमांवरदेखील उपलब्ध आहे. तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रतीदेखील संबंधित तहसिल कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/ अ‍ॅपच्या माध्यमातून स्व-प्रमाणीकरण व स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाइन पध्दतीने आधार क्रमांक भरता येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/ अ‍ॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाइन पध्दतीने अर्ज क्र. 6 ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि यूआयडीएआयकडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीद्वारे आधारचे प्रमाणीकरण करू शकतो. तथापि तपशिलात फरक असल्यास प्रमाणिकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे. मतदारास स्व-प्रमाणिकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणिकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाइन पध्दतीने त्याचा अर्ज क्र. 6 ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सादर करू शकतो.

घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 11 सप्टेंबर रोजी पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन  जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply