Breaking News

पाली एसटी बसस्थानकाची दूरवस्था

सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांचा उपोषणाचा इशारा

पाली ः प्रतिनिधी

अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाची जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून गेले तरीदेखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील प्रवासी व कर्मचार्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या बांधकामात होणार्‍या दिरंगाईबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ सोमवारी (दि. 18) पाली बसस्थानक आवारात आमरण उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, परिवहन विभाग पेण व संबंधित प्रशासनाला नुकतेच दिले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले आहे की, पाली बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत 2016, 2018 आणि 2021 रोजी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित कार्यालयाकडून पाली बसस्थानक लवकर बांधून पूर्ण करण्यात येईल याबाबत लेखी पत्राद्वारे आश्वासित केले होते. त्यानंतर बसस्थानकाची धोकादायक इमारत तोडण्यात आली आणि तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड बांधण्यात आली. मात्र त्यानंतर एक वर्ष उलटूनही परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे काम सुरू करण्यात आलेले नाही. जुन्या इमारतीचे डेब्रिज तसेच पडले आहे. नाल्याचा स्लॅब तुटलेला आहे. शौचालय बंद आहे. स्थानक आवारात सांडपाणी व दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरीत स्थानक दुरुस्त करून नवीन इमारत बांधकाम सुरू करावे, अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी दिला आहे.

या संदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर पत्राद्वारे पाठपुरावा करीत आहोत.

-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, रायगड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply