Breaking News

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात राज्य सरकारचे दुर्लक्ष

विवेक पाटील यांचे आश्वासन पुन्हा हवेत विरले;
पनवेल शाखेसमोर ठेवीदारांनी फोडला टाहो

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार वेळकाढूपणा करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रंगली आहे. कर्नाळा बँक व बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांच्याकडून पैसे देण्यात वारंवार फसवणूक होत असल्याने शुक्रवारी (दि. 7) पुन्हा एकदा ठेवीदार व खातेदारांनी आपला मोर्चा कर्नाळा बँकेच्या पनवेल येथील मुख्य शाखेवर वळवून संताप व्यक्त केला. आमचे पैसे द्या, असा टाहो त्यांनी या वेळी फोडला.
हजारो ठेवीदारांच्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेच्या बोगस, ढिसाळ आणि मग्रुर कारभारामुळे टांगणीला लागली आहे. असे असताना बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील मात्र कर्जवसुली झाल्यानंतर पैसे देऊ, असे मोघम उत्तर देत आहेत, पण त्यावर ठेवीदार आता विश्वास ठेवायला तयार नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून ठेवीदारांना कर्नाळा बँकेकडून पैसे दिले जात नाहीयेत. उलट टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार या सर्व कारभाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
असंख्य ठेवीदारांच्या आयुष्याची कमाई कर्नाळा बँकेत अडकली आहे. कित्येक जणांचे ऑपरेशन, उपचार, शिक्षण, व्यवसाय, रोजगार, घर, विवाह, मंगलकार्य अशा महत्त्वपूर्ण बाबी या बँकेतील घोटाळ्यामुळे आणि विवेक पाटील यांच्या बतावण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. खातेदारांना पैशांची गरज असताना मागील आठवड्यात फक्त 50 जणांनाच तेही प्रत्येकी चार हजार रुपये देण्यात आले, पण विवेक पाटील हे खातेदारांना गरजेनुसार पैसे दिले जात असल्याचा दावा करीत आहेत. त्यावर आम्हाला पैसे मिळत नाही असे ठेवीदारांनी सांगून विवेक पाटील यांचा दावा खोटा असल्याचा दाखला दिला आहे.
राज्य सरकारने पीएमसी बँक घोटाळ्यात लक्ष घातले, मात्र कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात का लक्ष घालत नाही, असा सवाल उपस्थित केला जात असून पैसे देणार सांगतात, पण कधी देणार याचे ठोस उत्तर विवेक पाटील अद्यापपर्यंत द्यायला तयार नाहीत. कर्जवसुली झाल्यानंतर पैसे देण्याच्या वलग्ना केल्या जात असून, कर्ज वसूल न झाल्यास स्वतःची प्रॉपर्टी विकून पैसे देण्याचे जाहीर केले असले, तरी 63 बोगस कर्जखात्यांच्या माध्यमातून वळविण्यात आलेले 513 कोटी रुपये विवेक पाटील यांच्या संस्थेत गेले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व पैसा बोगस कर्जदारांकडून कसा वसूल केला जाऊ शकेल याचे उत्तर विवेक पाटील आणि त्यांच्या बँकेकडे नाही. हे पैसे विवेक पाटील यांच्याकडे गेले असल्याने कर्जवसुली कशी होणार हा आणखी एक प्रश्न उपस्थित होत असताना विवेक पाटील हेच पैसे देऊ शकतील असे याचे साधे-सरळ उत्तर आहे, मात्र विवेक पाटील हे विविध कारणे देत ठेवीदारांना अंधारात ठेवत आहेत.
कर्नाळा बँकेचा 80 टक्के एनपीए आहे, त्यामुळे या बँकेचे दुसर्‍या बँकेत विलिनीकरण कसे होणार? हा मोठा प्रश्न आहे, मात्र विवेक पाटील विलिनीकरणाचा मुद्दा पुढे रेटत दिशाभूल करीत आहे. घोटाळ्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने खातेदार, ठेवीदार हवालदिल झाले आहेत. असे असूनही विवेक पाटील अजूनही पैसे देण्याचे वेळकाढू आश्वासनच देत आहेत. पैसे कधी देणार याचे ठोस उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. म्हणूनच त्यांच्याकडून बनवाबनवी सुरू आहे. परिणामी अनेक जण उपचार, मंगलकार्य, घर, शिक्षण, तर ग्रामपंचायती विकास आणि ठेवीदार स्वतःच्या हक्काच्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत.
ठेवीदारांना पैसे देण्याची मुदत संपून आठ दिवस झाले आहेत. तरीही विवेक पाटील यांना पाझर फुटत नाहीये. त्यामुळे या प्रकरणात झोपी गेलेले राज्य सरकार जागे होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघर्ष समिती ठेवीदारांच्या खंबीरपणे पाठीशी
कर्नाळा बँक आणि बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील हे ठेवीदारांना भूलथापा देऊन अंधारात ठेवत असताना, दुसरीकडे ठेवीदार संघर्ष समितीकडून खातेदार, ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व इतर सहकार्‍यांच्या माध्यमातून सातत्याने विविध स्तरांवर पाठपुरावा केला जात आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply