नवी मुंबई वाहतूक विभागाने शोधले अपघातप्रवण क्षेत्र
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणार्या अपघातांमधील मृतांची संख्या अधिक असल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने वाढते अपघात रोखण्यासाठी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना तीन महिन्यांपूर्वीच नवी मुंबई वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी विविध प्राधिकरणांना केल्या आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांमध्ये एकूण 464 अपघातांमध्ये 195 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, अपघातातील मृतांमध्ये दुचाकी अपघातांची संख्या सर्वाधिक असून त्यात चालकासह प्रवासी तसेच पादचारी अशा एकूण 97 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील वाढते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरदेखील नियमांचे उल्लंघन होतच असल्याने अपघातांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचा सर्वे करून वारंवार अपघात घडणारी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधली आहेत.
शहरातील अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती विविध शासकीय प्राधिकरणांना देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रतिनिधींसोबत नमूद ब्लॅक स्पॉट्सची पाहणीदेखील करण्यात आली आहे. लवकरच नवी मुंबई व पनवेल महापालिका, सिडको, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रतिनिधींसोबत शहरातील या ब्लॅक स्पॉट्स संदर्भात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. -पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग, नवी मुंबई
येथे सर्वाधिक धोका
अपघातप्रवण क्षेत्रामध्ये वाशी खाडी पुलाचे दोन्ही लेन, कांदा-बटाटा मार्केट प्रवेशद्वार ते अरेंजा सिग्नल, दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते आयसीएल शाळा, दत्त मंदिर-एलपी उरणफाटा उड्डाण पूल, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, मोराज सर्कल यासह पामबीच मार्गावरील सारसोळे सिग्नल, अक्षर सिग्नल, टीएस चाणक्य सिग्नल, सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी उड्डाण पूल, बेलपाडा बस स्टॉप, हिरानंदानी उड्डाण पूल खारघर, खारघर टोल नाका ते कोपरा उड्डाण पूल, आसूडगाव, कळंबोली सर्कल, कळंबोली गाव कट, कळंबोली ब्रीज, कळंबोली कॉलनी ब्रीज, खिडूकपाडा, नावडा फाटा, भिंगारी व्हिलेज, कोळखे व्हिलेज, कर्नाळा घाट आदी ब्लॅक स्पॉट्सचा समावेश आहे.