दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना होणार लाभ
अलिबाग ः प्रतिनिधी
शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणार्या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यंदा 11 लाख 35 हजार 119 पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना देण्याकरिता 11 लाख 35 हजार 119 पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण विभागाकडे ही सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडे ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर ती तालुका स्तरावर गटशिक्षण अधिकार्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील एक लाख 19 हजार 285 विद्यार्थ्यांसाठी पाच लाख 55 हजार 370 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे, तर सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील एक लाख 11 हजार 456 विद्यार्थ्यांसाठी पाच लाख 79 हजार 749 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.