नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकार्यांकडे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर 22 ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे.
अॅरीझोनामध्ये ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. ‘अपाचे’ हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.
भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015मध्ये 13,952 कोटी रुपयांचा ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च 2020पर्यंत 22 ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळेल. अलबामामधील अमेरिकन लष्कराच्या तळावर सध्या वैमानिक आणि अन्य क्रू मेंबर्सचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.
22पैकी 11 ‘अपाचे’ अत्याधुनिक एएनय/एपीजी-78 लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टीमने सुसज्ज असतील. ठरावीक अंतरावरून लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरून धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. ‘अपाचे’ दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-35ची जागा घेतील. ‘अपाचे’ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले हेलिकॉप्टर आहे.
पाकिस्तानी लष्कराकडेही अमेरिकन बनावटीचे एएच-1 कोब्रा हेलिकॉप्टर आहे. त्यांना टर्कीकडून तीस टी-129 हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत.