फलाटावर सापडलेल्या बालकास केले पालकांच्या स्वाधीन
रोहे : प्रतिनिधी
येथील रेल्वे पोलीस चौकीमधील अधिकारी व कर्मचार्यांनी नुकताच ऑपरेशन ’ नन्हे फरिश्ते ’ अंतर्गत फलाटावर सापडलेल्या बालकास त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. रेल्वे सुरक्षा बला तर्फे रेल्वेच्या मालमत्ता रक्षणासह प्रवशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध अभियान राबविण्यात येतात. रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक बी. के. दिवशे व बी. एस. वर्मा हे फलाट क्रमांक एकवर कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना एक लहान मुलगा रडत असल्याचे आढळले. उपनिरिक्षक राकेश पाटीदार यांनी त्या मुलाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मुल नाव व पत्ता सांगू शकत नव्हते. त्यानंतर त्यांनी आजुबाजुच्या परिसरात त्या बालकाच्या पालकांचा तपास सुरु केला. दरम्यान, अष्टमी येथे राहणारे मोहम्मद वाजीद व त्यांची पत्नी रेल्वे स्थानक परिसरात आले. ते आपल्या हरवलेल्या लहान मुलाचा शोध घेत असल्याचे समजले. त्यावेळी चौकीत असणारा बालक रेल्वे पोलिसांनी त्यांना दाखविला. आई, वडिलांनीं आपल्या मुलाला ओळखले व तो लहान मुलगाही धावत त्यांना जाऊन बिलगला.अरहान (वय 3) हा आपला मुलगा असून दुपारी घराबाहेर खेळता खेळता गायब झाला व तेव्हांपासून आम्ही त्याचा शोध घेत असल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करत रोहा रेल्वे पोलिसांनी अरहान याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केला.