नवरात्रोत्सवानिमित्त तरुणाईमध्ये उत्साह
पाली : प्रतिनिधी
वैश्विक महामारी कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. नवरात्रोत्सवात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली, मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. दोन वर्षांनंतर सण-उत्सव साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा तरुणाईचे आकर्षण असलेला गरबाही घुमणार आहे.
नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळांना देवीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून सजावटीवर भर देण्यात येत आहे. भाविकांमध्येही चैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. नवरात्रोत्सवात तरुणाईला गरबा, दांडियाचे विशेष आकर्षण असते. त्यासाठी परवानगी दिली असल्याने विविध मंडळे तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांबरोबरच नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गरब्यासाठी खास ऑर्केस्ट्रा, गायक, वाद्यवृंदासाठी आधीच बुकींग झाली आहे, तर दांडिया स्पर्धेतील बक्षिसे मिळविण्यासाठी ग्रुपची तयारी सुरू आहे. फॅन्सी दांडिया, विशेष कपडे, त्यावर सुसंगत ज्वेलरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एकूणच यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रचंड उत्साह, जोश, जल्लोष दिसून येणार आहे.