माणगावमध्ये वनविभाग व पोलिसांची कारवाई
माणगाव : प्रतिनिधी
वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या अवयवांना बाजारपेठेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक टोळ्या वन्यजीवांची हत्या करून तस्करी करीत आहेत. अशाच एका टोळीतील चार आरोपींना बिबट्याची 10 नखे विक्री करताना वनविभाग व पोलिसांनी माणगावमध्ये गजाआड केले आहे.
माणगाव तालुक्यातील कुंभार्ते गावच्या हद्दीत 21 सप्टेंबर रोजी वनविभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आरोपी मंगेश लक्ष्मण कुर्मे, (वय 45) व नईम अजीज शेख (वय 32, दोघेही रा. निजामपूर बोरवाडी रोड) यांना बिबट्याची नखे विकत असताना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. उर्वरित आरोपी दत्ता अनंत पवार (वय 22, रा. बेलवाडी कांदले, रोहा) व मंगेश गिरीजा पवार (वय 35, रा. गारबटवाडी, रोहा) यांना दुसर्या दिवशी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता त्यांना 26 सप्टेंबरपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.
या कारवाईत निजामपूर वनपाल संजय चव्हाण, वनरक्षक अशोक कोकडे, जर्मनसिंग पाडावी, अक्षय मोरे, वनपाल ज्ञानदेव सुभेदार, वनक्षेत्र लेखापाल हरेंद्र पालकर, वनरक्षक वैशाली मोरे, चालक विवेक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश अस्वार, शिपाई शाम शिंदे, मिलिंद खिरीट, दहिफळे, मिसाळ, पाटील यांनी सहभाग केला. या प्रकरणी अधिक तपास अनिरुद्ध ढगे करीत आहेत.