नवी मुंबई बचाव अभियानाचे अध्यक्ष दशरथ भगत यांची मागणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या कर्तव्यात कसूर न करता प्रारुप विकास आराखड्याबाबतीत सर्वसमावेशक जनजागृती, सूचना आणि हरकती यांचा अंतर्भाव करावा, त्यानंतर विकास आराखडा मंजूर करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी दसर्याच्या दिवशीच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई बचाव अभियानाचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
करण्यात आले.
नवी मुंबई महापालिका प्रारूप विकास आराखड्या बाबत नागरिकांत सर्वप्रथम जनजागृती करा त्यांच्याकडून हरकती आणि सूचना मागा, असा जागर करीत घटस्थापनेपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानानंतर बुधवारी नवी मुंबई बचाओ या शिर्षकाखाली माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नवी मुंबईतील नागरिक व पुढील पिढी वर्तमान व भविष्यातील नागरी सुखसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते.
या वेळी उपोषण स्थळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, संपत शेवाळे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राजेश शिंदे, माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र इंगळे, विजय वाळुंज, निसर्ग प्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र नेते दिपक पाटील, माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत,रूपाली भगत यांसह रिक्षा व टॅक्सी महासंघ नवी मुंबईचे विजय पाटील, मारुती कोंडे, सोनखार जेष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य, विरंगुळा केंद्राचे ज्येष्ठ नागरिक, माथाडी कामगार वसाहती नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबई शहराचा संकेतस्थळी प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा त्याच्या त्रुटीविरोधात दशरथ भगत यांनी राबिवलेले अभियान कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षांत सगळा सावळा गोंधळ व भ्रष्टाचार चालला होता. सिडकोत व पालिकेतही कोरोना काळात काही अधिकार्यांनी भ्रष्टाचार केला आहे, याबाबत आपण विधिमंडळ अधिवेशनात बोलणार असून भ्रष्टाचारी अधिकार्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
उपोषण ठिकाणी व्यासपीठावर दशरथ भगत यांनी भेट घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या वतीने महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक तथा नगर रचनाकार सोमनाथ केकाण यांनी निवेदन स्वीकारले.
विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचलाच नाही. परिणामी विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी समजून घेणे सहज शक्य नसल्याने नवी मुंबईकर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली. याचा बोध महापालिकेने घ्यावा.
-दशरथ भगत, उपोषणकर्ते
RamPrahar – The Panvel Daily Paper