पनवेल ः रामप्रहर वृत्त
जय भारतीय जनरल कामगर संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल लिमिटेड कंपनीतील कामगारांना 16 हजार 200 रुपयांची भरघोस पगारवाढ तसेच विविध सुविधा देणारा करार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनीतील कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्या दालनात नुकताच झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि हायकल लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार कामगारांना चार वर्षांसाठी प्रति महिना 16 हजार 200 रुपये, निवृत्तीनंतर दोन वर्षांसाठी मेडिकल पॉलिसी, दोन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, सहलीसाठी सात हजार 500 रुपये, दोन लाख 50 हजार रुपयांची मेडिकल पॉलिसी तसेच जास्त खर्चासाठी आणखी एक पॉलिसी, यंदाच्या वर्षासाठी 37 हजार रुपये दिवाळी बोनस, फेस्टिवल अॅडव्हान्स म्हणून 20 हजार रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी या कामगारांना थकीत वेतनाचा फरक म्हणून साधारणतः चार ते सहा लाख रुपये मिळणार असून जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. खांदा कॉलनीमधील सहाय्यक कामगार आयुक्तालयात हायकल कंपनी पदाधिकारी आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेमध्ये करार झाला. या करारावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण, कंपनीचे एचआर हेड संचित सिन्हा, विशाल पाटील, डेप्युटी मॅनेजर देवेंद्र पालेकर, जय भारतीय संघटनेच्या सचिव समीरा चव्हाण, युनिट सेक्रेटरी नारायण पाटील अध्यक्ष प्रशांत कदम, राजेश साळवी, सतीश घरत, नथुराम म्हात्रे, हरिश भोईर, योगेश भोगले, संतोष शिर्के, जीन कार्डोझा आदी उपस्थित होते.
कामगारांचे प्रश्न आपले आहेत असे समजून कामगार नेते जितेंद्र घरत काम करीत आहेत. कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेतूनच ते मार्गक्रमण करीत आहेत. कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यामध्ये कायम समन्वय आवश्यक आहे आणि ते घडविण्याचे काम जितेंद्र घरत करीत आहेत.
-प्रशांत ठाकूर, आमदार