पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 4) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले आहेत. तर 112 जण कोरोनामुक्त झाले. तसेच दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 135 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 63 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 46 रुग्ण आढळले तर 49 रुग्ण बरे झाले आहे.
महापालिका हद्दीत कामोठे सेक्टर 10 व पनवेल भिंगारी येथील अशा दोघांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तर आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल 43, नवीन पनवेल 12, खांदा कॉलनी तीन, कळंबोली 17, कामोठे 20, खारघर 32, तळोजा आठ अशी आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णसंख्येत पनवेल 19, नवीन पनवेल सहा, कळंबोलीत आठ, कामोठे 16, खारघर 10, तळोजा येथे चार यांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण 2713 रुग्ण झाले असून 1581 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 58.27 टक्के आहे. 1050 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये दिघाटी सहा, उलवे सहा, करंजाडे पाच, भोकरपाडा, पळस्पे, साई, शेलघर येथे प्रत्येकी चार, कोळवाडी तीन, आकुळवाडी, भिंगार, बोनशेत, केळवणे, कोप्रोली, ओवळे, पालेबुद्रुक, पोसरी, सुकापूर, विचुंबे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये नेरे आठ, करंजाडे पाच, उलवे पाच, खेरणे चार, सुकापूर चार, आकुर्ली, देवद, शिरढोण येथे प्रत्येकी तीन, ओवळे दोन, आदई, आजीवली, चिंचपाडा, दापोली, कोळखे, कोळवाडी, उसर्ली, वडघर, वहाळ, वाकडी, वावंजे, विचुंबे येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
नवी मुंबईत 257 जण पॉझिटिव्ह; 150 कोरोनामुक्त
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शनिवारी (दि. 4) कोरोनाची लागण झालेले 257 जण आढळले असल्याने बधितांची एकूण संख्या सात हजार 602 झाली आहे. तर 150 जण बरे होऊन घरी परतले असल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 266 झाली आहे. तसेच दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 239
झाली आहे.
सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 97 रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी बेलापूर 27, नेरुळ 69, वाशी 31, तुर्भे 12, कोपरखैरणे 50, घणसोली 35, ऐरोली 27 व दिघा 6 असा समावेश आहे.
उरण तालुक्यात 13 जणांना लागण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात शनिवारी (दि. 4) कोरोनाचे 13 रुग्ण आढळले आहेत. तर सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी तीन, उरण दोन, सारडे, बोकडवीरा, पागोटे, आवरे, नवीन शेवा, जासई, रांजणपाडा, सोनारी येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये नवीन शेवा तीन, चिर्ले, जासई, जेएनपीटी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 317 झाली आहे. त्यातील 236 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 76 रुग्ण उपचार घेत आहेत व पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
रोह्यात आठ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात शनिवारी (दि. 4) कोरोनाचे आठ नवे रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली.
निधन झालेल्या रुग्णांमध्ये 76 वर्षीय पुरुष व 59 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर आढळलेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण शहरातील व सात रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तसेच तीन महिलांचा व पाच पुरुषांचा समावेश आहे. तालुक्यात बाधीत व्यक्तींची संख्या 108 वर पोहचली आहे. शनिवारी रुग्णाने कोरोनावर मात केल्याने बर्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 58 आहे.
महाडमध्ये आठवडाभर जनता कर्फ्यू
महाड : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या कमी करण्यासाठी महाडकरांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन अर्थात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रायगडातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा बंदीची देखील मागणी होत आहे. हा जनता कर्फ्यू सोमवारी (दि. 6) ते सोमवारी (दि. 13) दरम्यान आहे. या मध्ये दुधविक्री सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरू राहील, तसेच दवाखाने, मेडीकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने, अस्थापने बंद असतील. तर शासकिय कार्यालये, बँका सुरु राहणार आहेत. तसेच पोलिसांना देखील कारवाईचे आदेश नसणार आहेत.