Breaking News

मराठा समाजाचा रायगडात एल्गार

आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारचा निषेध

पनवेल ः वार्ताहर, प्रतिनिधी
मराठा आरक्षण लागू व्हावे याकरिता राज्य सरकारने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 25) रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पनवेलमध्ये मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने मराठा समाजात राज्य सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरला असून, त्याचे पडसाद शुक्रवारी रायगड जिल्ह्यात उमटले.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे एकाच दिवशी 20 ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले, त्याचप्रमाणे जिल्ह्यात आंदोलन झाले.
पनवेलमध्ये तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्यासह रामदास शेवाळे, गणेश कडू, प्रकाश खैरे, राजेंद्र भगत, समीर कदम, यतीन देशमुख, महाडीक  तसेच अनेक मराठा बांधव सहभागी झाले होते. या वेळी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने नायब तहसीलदार राहूल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply