Breaking News

नवी मुंबईतही डोळ्यांची साथ

वाशी महापालिका रुग्णालयात दररोज 25 रुग्णांवर उपचार

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरातही डोळे येण्याची साथ आली असून गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका नागरी आरोग्य केंद्र,महापालिका व खासगी रुग्णालयात नेत्रसंसर्गबाधित रुग्ण वाढल्याच्या माहिती समोर येत आहे. अशी लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घ्यावी, नेत्रतज्ज्ञांकडून उपचार करावेत, गॉगल लावावा, शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, घरीच राहावे असे आवाहन महापालिका वैद्यकीय अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. वाशी महानगरपालिका रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून दररोज 20 ते 25 डोळ्याची साथ येणार्‍या रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती डॉ. पुनिता पारती यांनी दिली आहे. महापालिका रुग्णालय, खासगी रुग्णालयात आहे नेत्रसंसर्गबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून नवी मुंबई शहरातही मध्येच कडक ऊन, मध्येच पावसाळा, ढगाळ वातावरण असे उष्ण-दमट हवामान आहे. हवेमध्ये दमटपणा वाढला की संसर्गजन्य रोग जंतूंना पोषक वातावरण मिळते, त्यामुळे संसर्गजन्य आजारात वाढ होत आहे. या दिवसांत इतर आजारांसोबत डोळ्याचे विकारही जडत आहेत. डोळे आल्याने डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यात काहीतरी खूपल्यासारखे वाटणे, डोळे लालबुंद होणे अशी लक्षणे आढळतात. या सर्वात अनेक रुग्णांमध्ये डोळे अधिक लालसर होण्याचे प्रमाण निदर्शनास येत आहेत. अशी माहिती महापालिका वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. दिवाळी पूर्व मुलांची सहामाही परीक्षा होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील ही विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षेला सुरुवात झालेली आहे, परंतु नवी मुंबई शहरातही डोळ्यांची साथ झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शाळेमध्येही दोन ते तीन विद्यार्थी डोळ्यांची साथ आल्याचे आढळत आहेत. तसेच शिक्षकांनाही डोळ्यांची लागण झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना दरम्यानच्या कालावधीत घरी राहण्यास सांगितले जात आहे. तर डोळे आलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून त्या ठिकाणी त्यांची परीक्षा घेतली जात आहे, अशी माहिती राफनाईक विद्यालयाचे शिक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

 काळजी घेण्याचे आवाहन –

हवेमध्ये दमटपणा वाढला की संसर्गजन्य आजारात वाढ होत आहे. या दिवसांत इतर आजारांसोबत डोळ्याचे विकारही जडत आहेत. नवी मुंबई शहरात गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ आलेल्या रुग्णांची वाढ होत आहे. यामध्ये रुग्णांचे डोळे अधिक लालसर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे डोळे आलेल्या रुग्णांनी घरीच रहावे तसेच गर्दीत जाणे टाळावे, शक्यतो त्या ठिकाणी गॉगल वापरावा तसेच डोळ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, अशा सूचना वाशी महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत जावदे यांनी केल्या आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply