सिडको प्रशासनासोबत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी
बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळणे संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांसह बैठक झाली. या वेळी बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, सीबीडी येथे बालभवन उभारणे, सीवूड्स येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, टाटा पॉवरखालील नर्सरी, बेलापूर गाव येथील कुस्तीचे मैदान, शुटींग रेंज तसेच शिरवणे गणेश मंदिर शेजारी मंदिर ट्रस्टला भूखंड देणे अशा विविध प्रयोजनाकरिता भूखंड उपलब्ध करून देणेबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. डॉ. शिंदे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत विविध प्रयोजनाकरिता भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे सूचित केले. आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईमध्ये विविध प्रयोजनाकरिता सामाजिक सेवेचे भूखंड उपलब्ध करून देणेबाबत मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. दोन दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली होती. याच अनुषंगाने डॉ. शिंदे यांनी संबंधित अधिकार्यांसह बैठक आयोजित केली होती. या बैठकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, जनार्दन म्हात्रे, प्रदीप पाटील, नरेश गौरी, विकास मोकल, रुपेश चव्हाण तसेच सिडकोचे मुख्य नियोजनकार व्ही. वेणुगोपाल, शहरसेवा व्यवस्थापक दीपक जोगी, प्रशासन महाव्यवस्थापक जगदीश राठोड, सामाजिक सेवा अधिकारी प्रशांत भांगरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.