उरण : वार्ताहर
दिवाळी सण जवळ येत असल्याने विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून अनेकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीनिमित्त आकाशकंदील, पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. चिनी बनावटीचा माल तकलादू आणि प्रदूषण वाढवित असल्याने यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदील, पारंपरिक पणत्यांना मागणी दिसून येत आहे.
विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. बाजारात आकर्षक आकाशकंदील, पणत्या, दिवे दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. यंदा ग्राहकांनी चिनी बनावटीच्या आणि प्लास्टिकच्या आकाशकंदिलांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करणार्या उरणच्या गावंड कुटुंबीयांकडे मागणी सातत्याने वाढत आहे. चायना मेडपेक्षा देशी बनावटीच्या आकाशकंदिलांना जास्त पसंती मिळत नसल्याचे विक्रेते म्हात्रे यांनी सांगितले.
रंगीबेरंगी, कापडी, हॉलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगचे असंख्य प्रकारचे आकर्षक आकाशकंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. त्यात पॅराशूट कंदील, आकाशदीप, फायर बॉल, कलश, टोमॅटो बॉल, कापडी आकाशकंदिलांना चांगली मागणी असून 50 ते 500 रुपयांपर्यंत भाव आहे. मिनी आकाशकंदील 20 रुपयांपासून महाआकाशकंदील जवळपास एक हजार रुपयांपर्यंत आहे.
मातीच्या पारंपारिक पणत्यांनाही मागणी असून एक डझन 50 रुपये या दराने आम्ही विकतो, असे पूजा दीपक मांडेलकर यांनी सांगितले, तर किल्ल्यावर ठेवण्यासाठी शिवाजी महाराज, मावळे यांच्या प्रतिकृतीही उपलब्ध असून त्यांचा दर 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत आहे. बच्चेकंपनी मोठ्या प्रमाणात ते विकत घेत आहेत, असे सुरेखा कुंभार यांनी सांगितले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …