पनवेल युवा चषकाचा व्यापारी संघ मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त
आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. व्यायामाचे महत्त्व अधिक आहे आणि म्हणूनच आपण मैदानी खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे. आयुष्यात खेळाचे महत्त्व
अधिक असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. जागृती फाउंडेशन आणि श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट आयोजित पनवेल युवा चषक 2023 क्रिकेट सामान्यांच्या वेळी ते बोलत होते.
जागृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे व श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांनी पनवेल युवा चषकाचे आयोजन डॉक्टर, सनदी लेखापाल, व्यापारी असोसिएशन, पोस्ट ऑफिस टीम, पत्रकार,
वकील, शासकीय कर्मचारी यांच्याकरिता केले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व्यापारी संघाचे कॅप्टन मनोहर सचदेव यांच्या व्यापारी संघाने पटकावले. त्यांना अकरा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार व चषक सनदी लेखापाल जयवंत तांडेल कॅप्टन असलेल्या पनवेल सनदी लेखापाल, तृतीय पारितोषिक रुपये पाच हजार व चषक नामवंत वकील विशाल डोंगरे यांच्या टीमने पटकावले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या खेळाडूंनीही सामन्यात रंगात आणली. सामन्यातील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजने खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आले.
या सामन्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, उद्योजक इकबालशेठ काजी, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पत्रकार संजय कदम, रवींद्र गायकवाड, ज्येष्ठ संपादक विशाल सावंत, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे, गौरव जहागीरदार, विशाल सावंत, शंकर वायदंडे, मंदार दोंदे, असीम शेख आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper