![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/02/kabaddi-kumari-winner-1024x871.jpg)
बीड : प्रतिनिधी : कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे ठाणे आणि पुणे संघांनी विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर मात केली, तर पुण्याने यजमान बीड संघाला नमविले.
कुमारी गटात झालेल्या अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मध्यंतराला पुणे संघाकडे 22-11 अशी आघाडी होती. पुण्याच्या मानसी रोडे, पल्लवी गावडे व समृध्दी कोळेकर यांच्या खोलवर चढायांच्या जोरावर हा सामना त्यांच्या संघाने जिंकला, तर दिव्या गोगावले व नागेंद्रा कुरा यांनी चांगल्या पकडी केल्या. बीडच्या शितल म्हेत्रे, आरती नागरे चौफेर चढाया करीत चांगली लढत दिली, तर अश्विनी शेळके हिने पकडी केल्या.
कुमार गटातील अंतिम सामन्यात ठाणे जिल्हा संघाने रत्नागिरी या संघावर 32-23 अशा गुणांनी विजय मिळवित स्व. नारायण नागू पाटील यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पुरस्कृत फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मध्यंतराला ठाणे जिल्हा संघाकडे 16-9 अशी आघाडी होती. ठाण्याच्या गौरव पाटील व परेश हरड याने चौफेच चढाया करीत मैदान दणाणून सोडले, तर वैभव पाटील व पवनकुमार सिंग याने चांगल्या पकडी केल्या. रत्नागिरीच्या विवेक जांभळे व प्रतिक चव्हाण यांनी उत्कृष्ट चढाया केल्या, तर साईराज जाधव याने काही चांगल्या पकडी घेत विजयासाठी संघर्ष केला.