स्थानिकांकडून जल्लोषात स्वागत
माथेरान : रामप्रहर वृत्त
पर्यटनाचा दिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन शनिवारी (दि. 22) तब्बल तीन वर्षांनंतर धावली. माथेरान स्थानकात या गाडीचे माथेरानकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरानदरम्यानच्या डोंगर भागातून जाणार्या मिनीट्रेनच्या रूळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे खाडीसह रूळही वाहून गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नेरळ ते माथेरान मिनीट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. स्थानिकांच्या सोयीसाठी अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवा चालविण्यात येत होती.
अनेक पर्यटकांच्या आठवणींमध्ये घर करून असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सफारी बंद असल्याने येथे येणारे पर्यटक नेहमीच आपली नाराजी दर्शवित असत. अखेर मध्य रेल्वे विभागाने ही ट्रेन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आणि या मार्गावरील कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. त्यानंतर शनिवारपासून ही ट्रेन पर्यटकांच्या दिमतीस पुन्हा धावू लागली आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ स्थानकातून सुटलेली पहिली मिनीट्रेन 11 वाजता माथेरानमध्ये दाखल झाली. या पहिल्याच ट्रेनला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.