खारघर ः बातमीदार
शासनाने जलभूषण पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात जूनमध्ये घेतलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन नवी मुंबईतील संघर्ष फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाकडून सोमवारी (दि. 7) कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले.
शासनाने 12 जून 2020च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जलक्रांतीचे जनक म्हणून जलभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला, परंतु राज्यात जलक्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केली. पाणी अडवा, पाणी जिरवा, हा मूलमंत्र देत जलसंधारण खाते सुरू केले. पाणलोट विकासाचे जनक म्हणून नाईक ओळखले जातात.
शासनाने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जलभूषण पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात काढलेले परिपत्रक सुरू असलेल्या अधिवेशनात रद्द करून माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी पुरस्कार देण्याचे परिपत्रक काढावे, अशा मागणीचे निवेदन संघर्षकडून देण्यात आले. या वेळी दिलीप चव्हाण, दत्ता घंगाळे, हेमजी पांडे, गणेश देशमुख, संतोष चव्हाण, सरेश कुमार, अशोक राठोड, सुरेश आडे, संजय गव्हाणे, राजू साळवे, राजेश राठोड, इंदल चव्हाण आदी उपस्थित होते.