सहा जण अटकेत; वनविभागाची कारवाई
पाली : प्रतिनिधी
खैर वृक्षांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सहा जणांना सुधागड वनविभागाच्या टीमने अटक केली असून, या गुन्ह्यातील दोन वाहने आणि लाकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाली-खोपोली मार्गावर सुधागड तालुक्यातील वनक्षेत्र कानसळ गावानजीक सोमवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास पीकअप (एमएच 06-बीजी 2884) वाहनातून खैराच्या झाडाचे तुकडे ट्रक (एमएच 17-सी 787)मध्ये भरत असल्याचे गस्त घालणार्या वनविभागाच्या टीमला दिसून आले. याबाबत पीकअप वाहनचालक नरेंद्र वारंगे (रा. तोरणपाडा, ता. सुधागड) याला विचारणा केली असता, हा माल ट्रकचालक निजाम हुसेन पटई (रा. चिपळूण) याच्या सांगण्यावरून महागाव येथून आणल्याचे सांगितले, मात्र त्याचा वाहतूक परवाना त्यांच्याकडे नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात पीकअप वाहनचालक नरेंद्र वारंगे, ट्रकचालक निजाम पटई यांच्यासह बळीराम हिलम, बाळू पवार, नारायण घोगरकर, रमेश हिलम (सर्व रा. भोप्याची वाडी, ता. सुधागड) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींचे जवाब नोंदवून पुढील तपास सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.