Breaking News

रायगडातील एकही प्रकल्प बाहेर गेेलेला नाही : ना. सामंत

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. रायगडमधील चारही प्रकल्प रायगडातच होणार. बल्ड ड्रग पार्क राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल. जिल्ह्यात आणखी काही प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारानंतर पालकमंत्री पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील प्रकल्प रद्द झाले असा खोटा प्रचार करून काही लोक जनतेची दिशाभूल करीत आहेत. रायगडमधील प्रकल्प रायगडातच होणार. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे जनतेने हे प्रकल्प स्वीकारावेत. या प्रकल्पांना विरोध करु नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी या वेळी केले.
शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत आम्ही शेतकर्‍यांशी चर्चा करू. या प्रकल्पांमध्ये नोकरी देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. स्थानिक पातळीवरच कुशल कामगार मिळावेत यासाठी कौशल्य विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे ना. सामंत यांनी सांगितले.
सध्या राज्यात खोटे बोलून तरुणांना भडकविण्याचे काम केले जात आहे. आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र दिली जात नाहीत. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पप्रकरणी हायपॉवर कमिटीची बैठक का झाली नाही?, रायगडातील प्रकल्पांसंदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक का झाली नाही?, टाटा एअरबस प्रकल्पाबाबत मागच्या उद्योगमंत्र्यांनी एकतरी कागद दिला होता का? या प्रश्नांची उत्तरे आमच्यावर टीका करणार्‍यांनी द्यावीत, असे आव्हान ना. सामंत यांनी दिले.
राज्यात काही नवीन प्रकल्प देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. 1600 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प यावेत यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे, असेही ना. सामंत यांनी सांगितले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply