जलवाहिनी फुटली, पिण्याच्या पाण्याची गैरसोय
पेण : अनिस मनियार
राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या पेण स्थानकामागचे शुक्लकाष्ठ सुरूच असून, या स्थानकामध्ये प्रवाशांना कोणतीच सोयीसुविधा राहिली नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असून, पाणी साठवण टाकी मात्र कोरडी झाली आहे. त्यामुळे या स्थानकांत प्रवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
पेण एसटी स्थानकाच्या बांधकामाला अनेक वर्षे झाली असून, ही इमारत मोडकळीस आली आहे. पावसाळ्यात कंट्रोल आफिसजवळ तसेच वाहक-चालक विश्रांतीगृह येथील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या असून, त्यावेळी फक्त मुलामा देण्याचे काम झाले. स्थानकाची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. आसन व्यवस्था मोडक्या अवस्थेत असून बसण्यासाठी जागा नसल्यामुळे प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. स्थानकातील स्वच्छतागृह परिसरात दुर्गंधी भरुन राहिली असून, तेथे नाक मुठीत धरूनच प्रवाशांना विधी उरकावा लागतो. पावसाळ्यात तर या स्थानकाचे तलावात रूपांतर होते. गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना गाडी पकडावी लागते. हे पाणी ओसरल्यानंतर पेण बस स्थानक चिखलाचे आगार झालेले असते.
प्रवाशांच्या सेवेसाठी‘ असणार्या एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. पेण स्थानकातील उपहारगृह बंद झाले आहे. मुंबई, बोरीवलीकडे जाणार्या गाड्या त्यांच्या ठरलेल्या जागेवर न लावता अनेकवेळा कंट्रोल केबिनच्या समोरच लावल्या जात असल्यामुळे प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी धावाधाव होते. स्थानकातील गाड्यांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेकवेळा अपघातही झाले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या पाहता स्थानक नव्याने बांधणे गरजेचे आहे. मात्र स्थानक बांधण्याचे घोंगडे गेल्या सात-आठ वर्षांपासून भिजत पडले आहे.
फक्त व्हिडिओ कॅमेरे लावून स्थानकाला मुलामा देण्याचे काम करण्यात आले आहे. पेण एसटी स्थानकाकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे अनेक गैरसोयी वाढल्या आहेत. एसटी प्रशासनाने लवकरात लवकर पेण स्थानकातील सोयी-सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.