Breaking News

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा कमी करावी

पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाची मागणी  

पनवेल : रामप्रहर वृत्त
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा दोन महिन्यांवरून 14 दिवसांची करण्यात यावी, अशी मागणी पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितच्या वतीने कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. 1) ना. सावे यांना निवेदन देण्यात आलेे.
निवेदन देतेवेळी पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष कुंडलिक काटकर, संचालक बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते. या  निवेदनात म्हटले आहे की, 250पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका म. स. सं . अधिनियम 1960चे कलम 73 कब व निवडणूक नियम 76नुसार घेण्यात येत असून या निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी हा सुमारे दोन महिन्याचा आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहाणार्‍या व्यक्तींना मानधन 7500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हे मानधन दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कमी असल्याने निवडणूक अधिकारी 250पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी नाखुश दिसत आहेत. त्यामुळे 250पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मूळ निवडणूक नियम 76 (जुन्या पद्धतीने म्हणजे 14 दिवसांची नोटीस देऊन अधिमंडळाच्या सभेत निवडणूक पूर्ण करणे) नुसार घेण्याबाबत योग्य ते बदल व्हावेत. असा बदल झाल्याने संस्थांच्या खर्चात बचत तर होईलच, त्याचबरोबर निवडणूक अधिकार्‍यांनासुद्धा योग्य मानधन मिळेल व कमी वेळेत निवडणुका पार पडतील. त्या अनुषंगाने निवडणूक नियम क्र. 76मध्ये योग्य ती तरतूद करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply